prakash ambedkar letter to mallikarjun kharge : छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर झालेल्या भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या सभेत उपस्थिती दाखवल्यामुळं प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आता इंडिया आघाडीमध्ये सहभागी होणार असं जवळपास निश्चित मानलं जात होतं. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेल्या पत्रामुळं पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत आहे. महायुती मनसेसह काही पक्षांना सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर, महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकर यांचं समाधान करण्याच्या प्रयत्नात आहे.
लोकसभेचं जागावाटप करताना वंचित बहुजन आघाडीशीही चर्चा सुरू आहे. मात्र, जागावाटपावरून तिढा निर्माण झाला आहे. त्यातच प्रकाश आंबेडकर हे जागावाटपाबद्दल जाहीरपणे विधानं करत आहेत. महाविकास आघाडीतील पक्षांवर टीका करत आहेत. अशातच आता त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी काँग्रेसला ७ जागांवर पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्या सात जागा कोणत्या ते सांगावं, अशी विनंती त्यांनी खर्गे यांना केली आहे.
आपल्या पत्रात आंबेडकर म्हणतात, ‘लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीच्या सातत्यानं बैठका होत आहे. मात्र, या बैठका व चर्चांपासून वंचितला दूर ठेवलं जात आहे. ठाकरेंची शिवसेना व पवारांची राष्ट्रवादी आमच्या प्रतिनिधींचं म्हणणंच ऐकून घ्यायला तयार नाही. त्यांच्या या वर्तनामुळं आमचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला आहे.'
‘देशातून जातीयवादी, फूट पाडणारं आणि लोकशाही विरोधी भाजप-आरएसएसप्रणित सरकार घालवणं हाच आमचा अजेंडा आहे. त्याच विचारातून आम्ही काँग्रेसला महाराष्ट्रात ७ जागांवर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीत तुमच्या वाट्याला येणाऱ्या जागांपैकी या सात मतदारसंघांची नावं आम्हाला द्यावीत. आमचा पक्ष या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला सर्व प्रकारची मदत करेल,’ अशी ग्वाही प्रकाश आंबेडकर यांनी खर्गे यांना दिली आहे. भविष्यातील आघाडीच्या दृष्टीनं आम्ही हा प्रस्ताव ठेवत आहोत, असंही आंबेडकरांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.