Sangli loksabha election : महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा अखेर तसाचराहिला आहे.काँग्रेस नेते विशाल पाटील (vishal patal) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने त्यांची बंडखोरी संपवण्यात काँग्रेसला अखेरच्या क्षणापर्यंत अपयश आले.विशाल पाटील यांनी सांगलीतून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्यानं महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. विशाल पाटील यांना निवडणूक आयोगाकडून चिन्हही जाहीर झालं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
सांगलीत बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटलांवर काँग्रेस कारवाई करण्याच्या विचारात आहे. अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी दिली आहे.नाना पटोले म्हणाले की,विशाल पाटील यांची मनधरणी करण्याचे खुप प्रयत्न केले. त्यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगण्यात आले. मात्र त्यांना कुणीतरी फूस लावली आहे. विशाल पाटलांवर कारवाई संदर्भात काँग्रेसची २५ एप्रिलला बैठक बोलावण्यात आली असून त्यानंतर विशाल पाटील यांच्यावरील कारवाईचं स्वरूप स्पष्ट होणार आहे. अकोल्यात प्रचार सभेनंतर माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी ही माहिती दिली.
विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे. आज पत्रकार परिषद घेत विशाल पाटील म्हणाले की, हा जनतेचा लढा आहे. त्यामुळे माघार हा पर्याय नाही. काँग्रेसचे नेतृत्व गेली ९० ते ९५ वर्षे पक्षासाठी राबणाऱ्या जिल्ह्याला न्याय देतील अशी अपेक्षा होती. मात्र शेवटपर्यंत मला एबी फॉर्म मिळाला नाही. मात्र मला आशा होती की, महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराला सर्व वस्तुस्थिती समजावून सांगत त्यांना माघार घ्यायला लावली जाईल मला महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार केले जाईल. मात्र ती आशाही फोल ठरली आहे.
दरम्यान काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना निवडणूक चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने त्यांना लिफापा हे चिन्ह दिले आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरताना शिट्टी, टेबल आणि गॅस सिलिंडर यापैकी एक चिन्ह मागितले होते.
मात्र शिट्टी हे चिन्ह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे यांना दिलं आहे. लिफाफा चिन्ह भेटल्यानंतर विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.