Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघासाठी १९ एप्रिल रोजी मतदान झाले. सध्या परभणी मतदारसंघात कोण बाजी माहणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते संजय जाधव यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यावर सडकून टीका केली. येत्या २६ एप्रिलनंतर जानकर यांना रेल्वे स्थानकावर झोपावे लागेल आणि रत्नााकर गुट्टे हे तरुंगात असतील असे संजय जाधव म्हणाले. एवढेच नव्हेतर, ज्या दिवशी परभणीत सभा झाली, तेव्हाच मी जिंकलो, असेही संजय पाटील म्हणाले.
परभणी प्रतिष्ठित व्यापारी नागरिक डॉक्टर संवाद मेळाव्यात संजय जाधव म्हणाले की, "यंदाची लोकसभा निवडणुकीने वेगळेच वळण घेतले आहे. भाजपने बारामती आणि माढाची जागा वाचविण्यासाठी महादेव जानकर यांना परभणीमध्ये पाठवले. जानकर यांना एका विशिष्ट जातीचे लेबल लावून परभणीतून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजप मराठा आणि ओबीसी असे ध्रुवीकरण करून लढत आहे."
“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात मी ओबीसी, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आमचे डीएनए ओबीसी आहे. मग सर्वसामान्य जनतेने कुणाकडे बघायचे. पण माझा विजय त्याच दिवशी झाला, ज्या दिवशी मोंदीची परभणीत सभा पार पडली. २६ एप्रिलनंतर एक जण रेल्वेस्थानकावर झोपणार तर, दुसरा तुरुंगात झोपेल”, असा शब्दात संजय जाधव यांनी जानकर आणि रत्नाकर गुट्टे यांना टोला लगावला.
संजय जाधव पुढे म्हणाले की, “काही जण मोदी-मोदी करतात. पण त्यांना एक गोष्ट सांगतो की, परभणीचे मोदी आम्हीच आहोत. उद्या परभणीतील जनतेवर संकट आले तर कोण येणार नाही. आम्हीच तुमच्यासाठी धावून येणार आहोत. मोदी मदत करायला येणार नाहीत, हे लक्षात घ्या”, असे संजय जाधव या कार्यक्रमात म्हणाले. या कार्यक्रमात व्यासपीठावर खासदार फौजिया खान, आमदार डॉ. राहुल पाटील, विजय गव्हाणे विवेक नावंदर, यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.