Sangali loksabha election 2024 : राज्यात सांगली लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे. कधीकाळी काँग्रेसचा गड असलेला सांगली मतदारसंघ कोण राखणार? याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर बाजी मारली खरी पण काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने विशाल पाटील यांनी ठाकरेंच्या पैलवानाविरुद्ध शड्डू ठोकला आहे. सांगलीत शिवसेनेचा साधा नगरसेवक नसताना सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला गेलीच कशी? असा सवाल करत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांना काँग्रेस भवनवरील काँग्रेस शब्दही पुसून टाकला.
बराच काथ्याकूट झाल्यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील (Vishal patil) यांची समजूत काढण्यात यशस्वी होतील व विशाल पाटलांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला जाईल, अशी चर्चा असताना विशाल पाटलांनी सांगली लोकसभा निवडणुकीत विशाल पाटलांची बंडखोरी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्यानंतरही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज कायम असल्याने सांगलीत मशाल विरुद्ध विशाल लढत पक्की झाली आहे. विशाल पाटलांची उमेदवारी ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. आज दुपारपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत होती. मात्र, विशाल पाटील यांनी अर्ज मागे न घेता निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने सांगलीची लढत तिरंगी बनली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज माघारी घेण्याची मुदत सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. राजकीय पक्षांकडून अपक्ष व छोट्या पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी जोरदार प्रयत्न केले गेले. अर्ज माघारीच्या मुदतीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी माघार न घेतल्याने सांगली लोकसभा निवडणूक तिरंगी होण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेस आणि शिवसेनेचा दबाव झुगारून विशाल पाटलांनी अर्ज मागे न घेता आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे भाजपचे संजयकाका पाटील,शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात मुख्य लढत होत आहे. सांगली लोकसभेसाठी एकूण २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. आज सकाळपासून सांगलीतील वसंतदादा भवन या विशाल पाटलांच्या संपर्क कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली होती. त्यामुळे विशाल पाटील काय निर्णय घेणार, याची उत्सूकता होती.
विशाल पाटील यांनी सोमवारी सकाळी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे तसेच माजी आमदार विलासराव जगताप यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी उमेदवारी मागे घेऊ नये, अशी सूचना घोरपडे आणि जगताप यांनी विशाल पाटील यांना केली. त्यानुसार विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाने काही कारवाई केली तरी उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली.
संबंधित बातम्या