लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक अर्ज मागेघेण्याचा आज शेवटचा दिवस होता. यानंतर निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार आहेत.कुणाचा सामना कुणाविरुद्ध होणार, याचे चित्र स्पष्ट झालं आहे. अंतिम उमेदवारी यादीनंतर निवडणूक आयोगाने उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप केलं आहे. यातील एका उमेदवाराला दिलेल्या निवडणूक चिन्हावर सुप्रिया सुळेंनी (Supriya sule) आक्षेप नोंदवला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून (baramati loksabha constituency) अपक्ष लढणाऱ्या सोहेल शेख या उमेदवाराला ट्रम्पेट म्हणजेच तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिलं आहे. मात्र या चिन्हाला सुप्रिया सुळेंकडून हरकत घेण्यात आली आहे. याबाबतचं पत्र सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाला मेल करून पाठवलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस आहे, तर अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह दिलं गेलं आहे, यामुळे मतदारांचा गोंधळ होऊ शकतो, असं सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह दिल्यानंतर मतदारांचा गोंधळ होऊ शकतो. हा गोंधळ टाळण्यासाठी चिन्हाचं मराठी नाव बदलावे. नावातील तुतारी हा शब्द बदलून त्याऐवजी दुसरा शब्द निवडणूक आयोगाने द्यावा, अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.
सोहेल शेख यांना तुतारी चिन्ह मिळाले आहे. ते अपक्ष उमेदवाराचं नाव असून तो मूळचा बीडचा आहे. सोहेलने बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे आणि त्यालाही तुतारी चिन्ह मिळालं आहे.
दरम्यान बारामती लोकसभेतील अंतिम उमेदवार निश्चित झाल्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण३८उमेदवार रिंगणात आहेत,यातील प्रमुख लढत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात होणार आहे. सुप्रिया सुळे यांना तुतारी फुंकणारा माणूस तर सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह दिलं आहे.
बारामती लोकसभेत ४६ जणांनी अर्ज दाखल केला होता. २२ एप्रिल रोजी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ८जणांनी माघार घेतल्याने ३८उमेदवार मैदानात आहेत. बारामती लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. बारामतीमधील लढतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. ही लढत नणंद-भावजय यांच्यात होणार आहे, या लढतीकडे देशाचं लक्ष लागलं आहे.