मराठी बातम्या  /  निवडणुका  /  sanjay raut : काँग्रेसनं विशाल पाटील यांची हकालपट्टी करावी; संजय राऊत यांनी थेट तलवार उपसली!

sanjay raut : काँग्रेसनं विशाल पाटील यांची हकालपट्टी करावी; संजय राऊत यांनी थेट तलवार उपसली!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 17, 2024 01:45 PM IST

Sanjay Raut on Vishal Patil Rebellion : विशाल पाटील यांच्या बंडखोरीबद्दल स्पष्ट मत व्यक्त करताना संजय राऊत यांनी काँग्रेसकडं त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.

काँग्रेसनं विशाल पाटील यांची हकालपट्टी करायला हवी; संजय राऊत यांनी थेट तलवार उपसली!
काँग्रेसनं विशाल पाटील यांची हकालपट्टी करायला हवी; संजय राऊत यांनी थेट तलवार उपसली!

Sanjay Raut on Vishal Patil Rebellion : सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महाविकास आघाडीत निर्माण झालेली कटुता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. सांगलीतील निवडणूक लढण्यासाठी आग्रही असलेले काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. काँग्रेसनं विशाल पाटील यांच्यासह त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सांगली लोकसभा मतदारसंघातून (Sangli Lok Sabha Constituency) ठाकरेंच्या शिवसेनेनं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा काँग्रेसलाच मिळायला हवी, असा हट्ट विशाल पाटील यांनी धरला होता. आमदार विश्वजीत कदम यांनीही त्यासाठी बरीच मोर्चेबांधणी केली. दिल्लीपर्यंत बैठका घेतल्या. मात्र, शिवसेना ठाम राहिल्यानं अखेर विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.

नागपूर दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांना सांगतीच्या परिस्थितीबद्दल विचारलं असता त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. 'एखाद्या पक्षाचे लोक बंडखोरी करून महाविकास आघाडी विरुद्ध काम करत असतील तर त्यांच्यावर त्या पक्षानं कारवाई केली पाहिजे. अमरावतीमध्ये दिनेश बूब हे निवडणूक लढवत आहेत. पण उमेदवारी अर्ज भरण्याआधी त्यांनी राजीनामा दिला. हे संकेत आहेत, असं राऊत म्हणाले.

शिस्तभंगाची कारवाई व्हायलाच हवी!

'जर एखाद्या पक्षाचा व्यक्ती महाविकास आघाडीच्या निर्णयाविरुद्ध भूमिका घेत असेल आणि त्याच्या सोबत महाविकास आघाडीतील एखाद्या पक्षाचे लोक उभे राहत असतील. तर संंबंधित पक्षानं शिस्तभंगाची कारवाई करायला हवी. त्यांची हकालपट्टी करायला हवी असा साधारण संकेत आहे. मग तो कोणताही पक्ष असो, असं राऊत म्हणाले.

कोणाची ताकद किती हे लोक ठरवतील!

सांगलीत शिवसेनेची अजिबात ताकद नाही. हा काँग्रेसचा पारंपरिक गड आहे, या विशाल पाटील यांच्या दाव्याची संजय राऊत यांनी खिल्ली उडवली. 'कोणाची ताकद किती आहे किंवा नाही हे लोक ठरवतील. याच सांगलीत गेली १० वर्षे भाजपचे आमदार आणि खासदार निवडून येतायत. काँग्रेसचा बालेकिल्ला आणि परंपरा असताना सुद्धा मोक्याच्या ठिकाणी भाजपचे आणि संघ परिवाराचे लोक निवडून येतात. ह्याला मी त्या पक्षाची ताकद मानत नाही. भाजपला टक्कर द्यायची असेल तर सांगलीत शिवसेनाच उभी राहायला हवी हे आमचं धोरण आहे, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

 

 

 

 

WhatsApp channel