Navneet Rana meets Abhijeet Adsul : राजकारणात मान-अपमानापेक्षा वेळ निभावून नेण्याला महत्त्व असते. नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्यानं आपल्या राजकीय कौशल्यानं पुन्हा एकदा याची प्रचिती दिली आहे. पराकोटीचा विरोध असतानाही भाजपसोबत जाऊन उमेदवारी मिळवणाऱ्या नवनीत राणा यांनी आता कट्टर विरोधक आनंदराव अडसूळ यांच्या घरी जाऊन सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं आहे.
२०१९ च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेचे दिग्गज नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा २०२४ मध्ये काढायचा असा निर्धार अडसूळ यांनी केला होता. अमरावती लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून ते इच्छुक होते. मात्र, मागील वेळी अपक्ष लढलेल्या नवनीत राणा यांनी चातुर्यानं भाजपशी जवळीक साधली आणि तिकीटही मिळवले. त्यामुळं महायुतीत असूनही अडसूळ यांनी थेट असहकार पुकारला होता.
आनंदराव अडसूळ यांनी जातप्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून राणा यांच्या विरोधात कायदेशीर लढाई देखील लढली होती. मात्र, हा निकाल राणा यांच्या बाजूनं लागला आणि त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यामुळं राणा आणि अडसूळ यांच्यात कमालीची कटुता होती. त्यानंतरही राणा दाम्पत्य आज अडसूळ यांच्या घरी पोहोचलं.
अभिजीत अडसूळ यांनी राणा पती-पत्नीचं स्वागत केलं. राणा यांनीही अडसूळ पती-पत्नीला शाल व पुष्पगुच्छ दिले. या दोन्ही दाम्पत्यामध्ये काही वेळ चर्चाही झाली. त्यामुळं आता अडसूळ पितापुत्र राणा दाम्पत्याला पाठिंबा देणार का, याविषयी उत्सुकता आहे.
राणा दाम्पत्य भेटीसाठी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मीडियाच्या प्रतिनिधींनी आज सकाळीच आनंदराव अडसूळ यांच्याशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी राणा दाम्पत्यावर अत्यंत कडवट शब्दांत टीका केली. त्यांची अक्कलही काढली. 'त्या पती-पत्नीला अक्कल आणि नैतिकता दोन्हीही नाही. आटापिटा करून महायुतीच्या मंडळींनी मला थांबवलं आणि तिला उमेदवारी दिली. कोर्टाची केस मॅनेज केली, असं अडसूळ म्हणाले.
नरेंद्र मोदी यांची हवा नसल्याच्या नवनीत राणा यांच्या वक्तव्याचाही अडसूळ यांनी यावेळी समाचार घेतला. मागच्या निवडणुकीला नवनीत राणा राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये होत्या. त्यांनी तिथंच थांबायला पाहिजे होतं. मोदींची हवा नाही म्हणतात, मग इथं कशाला आलात? हा अडाणीपणा आहे. कृतघ्नपणा आहे, असं अडसूळ म्हणाले. १७ रुपयांच्या साड्या वाटून ह्यांनी स्वत:ची हवा निर्माण केली. लोकांनी नवरा-बायकोला बंटी आणि बबली नावं दिलीत ती विचारपूर्वक दिलीत. राजकारण सोडेन, पण त्यांचा प्रचार करणार नाही, असंही आनंदराव अडसूळ यांनी ठणकावलं होतं.