Shahu Chhatrapati Total Assets : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभरात उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. अर्जासोबत जोडण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातून उमेदवाराची संपूर्ण माहिती समोर येत आहेत. कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या संपत्तीचा आकडा प्रथमच समोर आला आहे. शाहू महाराजांकडं तब्बल २९७ कोटी ३८ लाख ८ हजार रुपयांची संपत्ती आहे.
शाहू छत्रपती यांनी मंगळवारी मोठं शक्तीप्रदर्शन करत लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यापुढं त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. शाहूंचे दोन्ही चिरंजीव संभाजीराजे आणि मालोजीराजे हे देखील यावेळी सोबत होते.
शाहू छत्रपती हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोल्हापूरच्या गादीचे वंशज आहेत. त्यांच्या नावे स्थावर व जंगम अशी मिळून २९७ कोटी ३८ लाख ०८ हजार रुपयांची संपत्ती आहे. शाहू छत्रपतींच्या पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावावर ४१ कोटी ६ लाखांची संपत्ती आहे. यात जंगम मालमत्ता १४७ कोटी ६४ लाख ४९ हजार रुपयांची तर, स्थावर मालमत्ता १४९ कोटी ७३ लाख ५९ हजारांची आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर २३.७१ कोटींची स्थावर व १७.३५ कोटींची जंगम मालमत्ता आहे.
शाहू छत्रपती यांच्याकडं १ कोटी ५६ लाखांचे सोन्याचे, तर ५५ लाखांचे चांदीचे दागिने आहेत. त्यांच्या नावावर असलेल्या गाड्यांची किंमत सुमारे ६ कोटी आहे. त्यांच्या नावावर १२२ कोटी ८८ लाख किंमतीची शेतजमीन आहे. तर, पत्नीच्या नावे ७.५२ कोटी रुपये किंमतीची शेतजमीन आहे. शाहू छत्रपतींच्या नावे कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही.
शाहू छत्रपती यांच्याकडं दोन व्हिंटेज कार आहेत. त्यात एक १९३६ ची मेबॅच कार आहे. ही कार १९४९ मध्ये खरेदी करण्यात आली होती. सध्या या गाडीची किंमत ५ कोटी रुपये आहे आणि १९६२ चं मॉडेल असलेली व त्याच वर्षी खरेदी केलेली एक मर्सिडीज शाहूंकडं असून तिची किंमत सध्या २० लाख रुपये आहे. तसंच, त्यांच्याकडं ४० लाख रुपये किंमतीची मर्सिडीज आहे. शाहूंच्या नावे असलेल्या १५.५ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या न्यू पॅलेस राजवाड्याचं बाजार मूल्य १८.११ कोटी रुपये आहे.
शाहू छत्रपतींचे प्रतिस्पर्धी उमेदवार महायुतीचे प्रा. संजय मंडलिक यांनीही कोल्हापुरातून लोकसभेसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांची एकूण संपत्ती १४ कोटी ३७ लाख २८ हजार ३९८ रुपये इतकी असल्याचं प्रतिज्ञापत्रातून समोर आलं आहे. मागील पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीमध्ये ५ कोटी ६५ लाख रुपयांची वाढ झाली आहे. मंडलिक यांच्याकडं १३ कोटी २१ लाख ९५ हजार ८७३ रुपये किमतीची स्थावर तर, १ कोटी १५ लाख ३२ हजार ५२५ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. २०१९ मध्ये संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांचा पराभव करून कोल्हापुरात विजय मिळवला होता.