Uttam Jankar to Meet Sharad Pawar : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपमधील वजनदार नेत्याला फोडून उमेदवारी दिल्यानतंर आता शरद पवारांनी ही जागा जिंकण्यासाठी डावपेच सुरू केले आहेत. या मतदारसंघातील वजनदार नेते उत्तम जानकर यांना आपल्या बाजूनं वळवण्यासाठी आता पवारांनी प्रयत्न सुरू केले आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह जानकर हे आज पवारांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर उत्तम जानकर नेमकी काय भूमिका घेतात यावर माढ्यातील निवडणुकीचा निकाल ठरणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवलं आहे. निंबाळकर यांच्या उमेदवारीला भाजपमधीलच अनेक नेत्यांचा विरोध होता. मात्र, भाजप निंबाळकरांच्या उमेदवारीवर ठाम राहिल्यानं मोहिते पाटील कुटुंबीयांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. पवारांनी लगेचच माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. मोहिते पाटील हे घराणं सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर घराणं असल्यामुळं आता भाजपसमोर सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात आव्हान निर्माण झालं आहे.
विरोधाची धार कमी करण्यासाठी भाजपनं इथं विविध समाजाच्या नेत्यांना हाताशी धरून बेरजेचं राजकारण सुरू केलं आहे. माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील चार व साताऱ्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी माळशिरसमध्ये भाजपचे राम सातपुते आमदार असले तरी तिथं धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांची मोठी ताकद आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जानकर यांनी राम सातपुते यांना जोरदार टक्कर दिली होती. अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला होता.
आता राम सातपुते हे सोलापूर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं पुढील निवडणुकीत माळशिरसमधून उत्तम जानकर यांना उमेदवारी देण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. विधान परिषद देण्याचीही तयारी दाखवली आहे. जानकर यांच्यासाठी फडणवीस यांनी विशेष विमान पाठवलं होतं. तिथं चर्चा झाल्यानंतर आता जानकर हे पवारांच्या भेटीसाठी पुण्यात पोहोचले आहेत.
माळशिरसमध्ये आमच्या आणि मोहिते-पाटलांच्या कार्यकर्त्यांची प्राथमिक चर्चा झाली आहे. आता शरद पवार यांच्यासमोर पुन्हा चर्चा होणार आहे. फडणवीस यांच्यासोबतही चर्चा झाली आहे. आता पवार साहेबांशी चर्चा करू. त्यानंतर १९ एप्रिल रोजी वेळापूर इथं कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत चर्चा होईल आणि निर्णय घेऊ. अद्याप निर्णय झालेला नाही, असं पवारांच्या भेटीआधी जानकर यांनी सांगितलं.
शरद पवारांसाठी काम करावं असा मोहिते पाटील आणि माझ्या कार्यकर्त्यांचा मोठा दबाव आहे. मात्र गेल्या ४०-५० वर्षांपासून आम्ही एकमेकांच्या विरोधात काम करतोय. अशा परिस्थितीत एकत्र नेमकं कसं यायचं हे शरद पवार साहेब सांगतील. म्हणून त्यांच्या भेटीसाठी आलो,' असं जानकर म्हणाले.