मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Priyanka Gandhi : नरेंद्र मोदींना मंगळसूत्राचं महत्त्व कळलं असतं तर…; प्रियांका गांधी यांचा घणाघात

Priyanka Gandhi : नरेंद्र मोदींना मंगळसूत्राचं महत्त्व कळलं असतं तर…; प्रियांका गांधी यांचा घणाघात

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 24, 2024 04:07 PM IST

Priyanka Gandhi slams PM Narendra Modi : काँग्रेस सत्तेत आल्यास तुमचं मंगळसूत्र हिसकावून घेईल या नरेंद्र मोदी यांच्या आरोपांना काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

माझ्या आईनं देशासाठी मंगळसूत्र अर्पण केलंय; प्रियांका गांधी यांचं नरेंद्र मोदी यांंना प्रत्युत्तर
माझ्या आईनं देशासाठी मंगळसूत्र अर्पण केलंय; प्रियांका गांधी यांचं नरेंद्र मोदी यांंना प्रत्युत्तर (Priyanka Gandhi Vadra-X)

Priyanka Gandhi slams PM Narendra Modi : काँग्रेस पक्ष सत्तेत आलं तर तुमचं मंगळसूत्र आणि सोनं-चांदी हिसकावून घेतलं जाईल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील एका जाहीर सभेत बोलताना केला होता. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मोदींच्या या आरोपांना जोरदार उत्तर दिलं आहे. ‘माझ्या आईनं तिचं मंगळसूत्र देशासाठी कुर्बान केलंय. मोदींना मंगळसूत्राचं महत्त्व काय कळणार? ते कळलं असतं तर ते असं बोलले नसते,' अशी बोचरी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कर्नाटकमधील बेंगळुरू इथं जाहीर सभेला संबोधित करताना त्या बोलत होत्या. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली. त्यापैकी ५५ वर्षे काँग्रेसचं सरकार देशात होतं. या काळात कुणी महिलांचं सोनं किंवा 'मंगळसूत्र' हिसकावून घेतलं का?, असा सवाल प्रियांका यांनी केला. 'युद्धाच्या काळात इंदिरा गांधींनी त्यांच्याकडचं सोनं देशाला दिलं. माझ्या आईचं 'मंगळसूत्र' देशासाठी कुर्बान झालं. भाजपच्या लोकांना महिलांचा संघर्ष समजत नाही. मोदींना मंगळसूत्राचं महत्त्व कळलं असतं तर त्यांनी अशा गोष्टी केल्या नसत्या,' असा टोला प्रियांका यांनी हाणला.

तेव्हा मोदींनी मंगळसूत्राचा विचार का केला नाही?

'नोटाबंदी लागू करून पंतप्रधान मोदींनी महिलांची बचत हिसकावून घेतली आणि शेतकरी आंदोलनादरम्यान ६०० शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले. त्या विधवांच्या मंगळसूत्राचा विचार मोदींनी केला का? मणिपूरमध्ये एका महिलेला नग्न अवस्थेत फिरवण्यात आलं, तेव्हा मोदी गप्प होते, ते काहीच बोलले नाहीत. त्यांनी त्यांच्या मंगळसूत्राचा विचार केला होता का?' आज मतांसाठी त्यांना महिलांच्या मंगळसूत्राची आठवण झाली. मतांसाठी महिलांना घाबरवत आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे,' असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

'सुपरमॅन' झाला महागाईमॅन

देशातील वाढत्या महागाईवरून प्रियांका गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. 'भाजपनं अनेक आश्वासने दिली, पण दिलं काहीच नाही. तुमच्यासमोर एका 'सुपरमॅन'ची प्रतिमा ठेवली गेली, पण प्रत्यक्षात महागाईमॅन मिळाला, असा टोलाही प्रियांका यांनी हाणला.

राज्यघटना बदलली तर…

राज्यघटनेनुसार या देशातील प्रत्येक व्यक्तीला, मग तो स्त्री असो वा पुरुष, कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, शेतकरी असो वा पंतप्रधान, सर्वांना समान अधिकार मिळतात. भाजप ही राज्यघटना बदलण्याच्या प्रयत्नात आहे. लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यघटना बदलली गेली तर तुमचे अधिकार काढून घेतले जातील, जनतेची ताकद कमी होईल, अशी भीती प्रियांका गांधी यांनी व्यक्त केली.

 

WhatsApp channel