NSVM Fulwari School in Nagpur : भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी शाळेतील मुलांचा वापर केल्याप्रकरणी नागपुरातील एनएसव्हीएम फुलवारी शाळेच्या संचालकावर कारवाई करण्याचे आदेश भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) मंगळवारी शिक्षणाधीकाऱ्यांना दिले आहेत. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने हे आदेश दिले. मात्र, या प्रकरणी भाजप उमेदवार नितील गडकरी यांच्यावर कारवाई कधी करणार, असा सवाल काँग्रेसनं केला आहे.
३ एप्रिल रोजी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजप आणि गडकरींविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. एनएसव्हीएम फुलवारी शाळेतील विद्यार्थ्यांना नितील गडकरी यांनी १ एप्रिल रोजी वैशाली नगर येथे झालेल्या निवडणूक प्रचार रॅलीसाठी बोलावले होते. कायदा आणि नैतिक निकषांकडे हे स्पष्ट दुर्लक्ष अत्यंत चिंताजनक आहे,” असे काँग्रेसने केलेल्या तक्रारीत म्हटले होते. लोंढे यांनी मुलांचा निवडणूक प्रचारासाठी वापर केल्याचे छायाचित्रे आणि व्हिडिओ क्लिपही देखील तक्रार अर्जात जोडले आहेत.
या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केली. “शाळेच्या मुख्याध्यापकांनी सादर केलेले पुरावे आणि लेखी स्पष्टीकरणादरम्यान, शाळेचे संचालक मुरलीधर पवनीकर यांना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नितीन गडकरींचे स्वागत करण्यासाठी शाळेतील मुलांचा वापर केलेल्या प्रकरणात ते दोषी आढळले. यामुळे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना संबंधित शाळेच्या संचालकावर नियमांनुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने मंगळवारी ही कारवाई केली आहे.
काँग्रेसने या निर्णयाचे स्वागत केले असले तरी गडकरींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असतांना केवळ शाळा प्रशासनावर कारवाई केल्याने गडकरी यांच्यावर या प्रकरणी कधी कारवाई करणार असे आदेश देण्यात आले आहे. “शालेय प्रशासनावर सुरू केलेल्या कारवाईचे आम्ही कौतुक करत असलो तरी भाजपच्या उमेदवारावर कोणतीही कारवाई झालेली नाही,” असे लोंढे म्हणाले असे म्हणत निवडणूक आयोग गडकरी यांच्यावर कधी कारवाई करणार असा सवाल देखील त्यांनी केला आहे.