Uddhav Thackeray Parbhani Rally : उद्धव ठाकरेंनी आज परभणीत भरपावसात भिजत सभा घेतली.मी वादळात उभा राहणार आहे, तुम्ही राहणार आहात की नाही,मी संकटाशी झुंज देणारा आहे,तुम्ही देणार आहात की नाही,कितीही पाऊस पडला तरी मी हटणार नाही. या शब्दांनी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरूवात केली. कितीही संकटे येऊ दे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील आम्ही मर्द मावळे आहोत. त्या संकटाला आम्ही चिरडून टाकले,तर हे संकट काहीच नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर केला आहे.
भरपावसात केलेल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजप,पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री शिंदेंसहनिवडणूक आयोगावरही हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, दोन दिवसापूर्वी मी पत्रकार परिषद घेतली होती. का तर निवडणूक आयोगाने मशाल गीतातील'जय भवानी'शब्दावर आक्षेप घेत ते काढून टाकण्यास सांगितले आहे. यावरून त्यांनी मोदी-शहांवर तोफ डागली.
परभणी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. मात्र उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू होताच पावसास सुरुवात झाली. मात्र उद्धव ठाकरेंनी पाऊस पडत असतानाही आपले भाषण पूर्ण केले. उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपाला वाटत असेल की सर्व काही पैशाने विकत घेता येते. मात्र निष्ठा विकत घेता येत नाही.परभणीकर हा पैशाने विकला जाणारा नाही,ही आपली परीक्षा आहे. वादळाला अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते, ती आपल्याकडे आहे.
परभणी हा माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. भाजपा आणि मिंध्यांना वाटतं की, सगळं काही पैशाने विकत घेता येतं. जय भवानी हा शब्द आपल्या प्रचार गीतामधून काढण्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे, मात्र तो शब्द आपण काढणार नाही.
निवडणूक आयोगावर टीका करताना उद्धव म्हणाले की,हा मोदी-शहांचा नोकर असलेला आयोग आहे. तुमचा जो महाराष्ट्राबाबत आकस आहे, त्याचा आम्ही फडशा पाडू. तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवायचे आहे ना, हिंमत असेल तर, पाहा प्रयत्न करून, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिले. महाराष्ट्रात यायचं व काहीही बोलायचं. म्हणे घराणेशाही संपवू. पण हा विचार कसा संपवणार.मला माझ्या आई-वडिलांचा अभिमान आहे, मी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब मीनाताईंचा पुत्र असल्याचा मला अभिमान आहे.आम्हीही जय श्रीराम असा जयघोष करतो. पण जय भवानी याबाबत तुमच्या मनात द्वेष आणि आकस का आहे, अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली. तसेच अब की बार भाजपा तडीपार अशा घोषणा दिल्या.
सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानावर टाकी करताना त्यांनी म्हटले की, हा विकृती आहे. त्यावर मोदी शहा बोलायला तयार नाहीत. अशा असंस्कृत माणसांना एकही मत महाराष्ट्रातून मिळता कामा नये, भाजपकडे बोलण्यासाठी काहीही राहिले नाही. मोदींचे नाणे महाराष्ट्रात चालत नाही. मोदींचा चेहरा महाराष्ट्रात चालत नाही. म्हणून गद्दारांच्या माध्यमातून तुमच्याकडे मते मागण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
अब की बार ४०० पार नाही तर भाजपा तडीपार करायची आहे. कारण, हे आपला महाराष्ट्र लुटत आहेत. उद्योग पळवून गुजरातला नेत आहेत. त्यामुळे आपला उमेदवार बंडु जाधव यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. मला मताधिक्य नको तर समोरच्याचं डिपॉझिट जप्त करा, असे म्हणत महादेव जानकरांचं डिपॉझिट जप्त करा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी परभणीतील सभेतून केलं.