मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Amit Shah : ..तोपर्यंत एससी-एसटी अन् ओबीसींचं आरक्षण कोणीही हटवू शकत नाही; अकोल्यात अमित शहांचं मोठं विधान

Amit Shah : ..तोपर्यंत एससी-एसटी अन् ओबीसींचं आरक्षण कोणीही हटवू शकत नाही; अकोल्यात अमित शहांचं मोठं विधान

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 23, 2024 08:32 PM IST

Amit Shah Rally In Akola : भाजपचा अखेरचा कार्यकर्ता असेपर्यंत आम्ही सीएएला हात लावू देणारनाही.जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत एससी, एसटी आणि ओबीसी यांचं आरक्षण कोणीही हटवू शकत नाही,असंही अमित शहा यांनी अकोल्यातील सभेत सांगितलं.

..तोपर्यंत एससी-एसटी अन् ओबीसींचं आरक्षण कोणीही हटवू शकत नाही; अमित शहांचं मोठं विधान
..तोपर्यंत एससी-एसटी अन् ओबीसींचं आरक्षण कोणीही हटवू शकत नाही; अमित शहांचं मोठं विधान

Amit Shah In Akola Rally : राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून दुसऱ्या टप्प्यातील मतदानास केवळ तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिल्याने प्रचाराचा धुरळा उडाला आहे. अमित शहा (Amit Shah) यांनी आज अकोल्यातील भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचार सभा घेतली. आपल्या भाषणात अमित शहांनी काँग्रेस व इंडिया आघाडीवर टीका करत सीएए व आरक्षणावर मोठं विधान केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भाजपचा अखेरचा कार्यकर्ता असेपर्यंत आम्ही सीएएला हात लावू देणार नाही. जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत एससी, एसटी आणि ओबीसी यांचं आरक्षण कोणीही हटवू शकत नाही, असंही अमित शहा यांनी ठणकावून सांगितलं. अकोल्यातील जलसिंचन योजना सुरू केल्याने येथील दुष्काळ दूर होईल, असा विश्वासही अमित शहा यांनी व्यक्त केला.

अमित शहा म्हणाले की, १० वर्षापूर्वी देशातील जनतेने भाजपने बहुमताने सत्तेत आणले. त्याचा उपयोग भाजपने जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटविण्यासाठी, सीमेपलीकडील दहशतवाद संपवण्यासाठी केला. मात्र, काँग्रेसकडून देशात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अमित शहा यांनी केला.

आम्ही ना काँग्रेसला परत येऊ देणार ना तिहेरी तलाकला -

शहा म्हणाले देशाचा विकास आणि विकसित भारत ही मोदींची संकल्प यात्रा आहे. अकोल्याचे उमेदवार अनुप धोत्रेंना मिळणारं एक-एक मत मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणारं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे म्हणतात की, महाराष्ट्रा आणि काश्मीरशी काय संबंध?मात्र मी तुम्हाला विचारतो काश्मीर देशाचा भाग आहे की, नाही? मोदींनी ३७० हटवून काश्मीरला भारताशी जोडलं. सोनिया मनमोहन सरकारच्या काळात देशात दहशतवादी हल्ले व्हायचे, बॉम्बस्फोट व्हायचे. मात्र आम्ही दहशतवाद संपवला. मोदींनी महाराष्ट्राला नक्षलवादातून बाहेर काढलं आहे. आम्ही ना काँग्रेसला परत येऊ देणार, ना ट्रिपल तलाकला, असा टोलाही अमित शाहांनी लगावला.

बटण असे दाबा की करंट इटलीत लागला पाहिजे - शहा

शरद पवार यांच्यावर टीका करताना अमित शहा म्हणाले की, शरद पवार १० वर्षे केंद्रीय सरकारमध्ये होते. त्यांनी सोनिया-मनमोहन सरकारने किती विकास केला,याचा हिशोब द्यावा. महाराष्ट्राचा विकास केवळ महायुतीचं सरकारच करू शकते. यामुळे कमळ बटण इतक्या जोराने दाबा की, याचा करंट इटलीत लागला पाहिजे, असा निशाणा अमित शाह यांनी लगावला.

इंडिया आघाडी म्हणत होती राम मंदिर व्हायला नको. देशाच्या स्वातंत्र्यापासून राम मंदिराचे काम थांबवलं होतं. मोदींनी पाच वर्षातच राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावला.

आज दुपारी साडे तीन वाजताअमित शहा यांच्या सभेचे अकोला येथेआयोजन करण्यात आले होते. मात्र अमित शहा दोन तास उशिराने सभेच्या ठिकाणी दाखल झाले. सभेच्या आधी जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. लोक डोक्यावर खुर्ची घेऊन सभास्थळी उभे होते.

WhatsApp channel