लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघात सोमवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख होती. त्यानंतर प्रत्येक मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) ३८ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये अपक्ष असलेल्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिलेले अपक्ष उमेदवार शेख सोहेलशहा युनुसशहा यांना तुतारी चिन्ह देण्यात आले आहे. या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यावर आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले असून त्यांचा आक्षेप फेटाळला आहे. तुतारी (Trumpet) चिन्ह आणि तुतारी वाजवणारा माणूस हे दोन वेगवेगळे चिन्ह असल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने (Election Commission) दिले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी परिपत्रक जारी करत सुप्रिया सुळे यांच्याकडून आलेल्या आक्षेपावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अपक्ष उमेदवार शेख सोयलशहा युनुसशहा यांना अराखीव/ खुल्या चिन्हांपैकी तुतारी हे चिन्ह त्यांच्या मागणी केलेल्या पसंतीक्रमानुसार देण्यात आले आहे. प्रस्तुत चिन्ह भारतीय निवडणूक आयोगाने निर्धारित करून दिल्याने यामध्ये कोणताही बदल करण्याचा अधिकार नसल्याचेही त्यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. दोन्ही चिन्हांच्या प्रतिकृती वेगवेगळ्या असून मरीठीतील नावेही भिन्न असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यावर आलेला आक्षेप अमान्य आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले की, बारामती लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला ट्रमपेट चिन्ह दिले आहे.'तुतारी आणि ट्रमपेट चिन्हावरून वाद झाला. ट्रम्पपेटला मराठीत तुतारी म्हटले जात असल्याने शरद पवार गटाकडून आक्षेप नोंदवला होता. मात्र निवडणूक आयोगाने आमचा आक्षेप फेटाळला आहे. निवडणूक आयोगाने सुप्रिया सुळे यांना पत्राद्वारे याबाबत कळविले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढणाऱ्या सोहेल शेख या उमेदवाराला ट्रम्पेट म्हणजेच तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिलं आहे. मात्र या चिन्हाला सुप्रिया सुळेंकडून हरकत घेण्यात आली आहे. याबाबतचं पत्र सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाला पाठवलं होतं. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस आहे,तर अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह दिलं गेलं आहे, यामुळे मतदारांचा गोंधळ होऊ शकतो, असं सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
हा गोंधळ टाळण्यासाठी चिन्हाचं मराठी नाव बदलावे. नावातील तुतारी हा शब्द बदलून त्याऐवजी दुसरा शब्द निवडणूक आयोगाने द्यावा, अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.