मराठी बातम्या  /  elections  /  lok sabha election : हत्ती गेला, शेपूट राहिलं... कोण, कोणासोबत आणि कुठून लढणार? उद्या सगळं स्पष्ट होणार

lok sabha election : हत्ती गेला, शेपूट राहिलं... कोण, कोणासोबत आणि कुठून लढणार? उद्या सगळं स्पष्ट होणार

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 26, 2024 07:31 PM IST

Mahayuti vs Maha Vikas Aghadi : गेल्या महिनाभरापासून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चेत नेमकं काय ठरलं आहे, ते उद्या स्पष्ट होणार आहे.

हत्ती गेला, शेपूट राहिलं... कोण, कोणाचा आणि कुठून लढणार? उद्यापर्यंत स्पष्ट होणार
हत्ती गेला, शेपूट राहिलं... कोण, कोणाचा आणि कुठून लढणार? उद्यापर्यंत स्पष्ट होणार

Maharashtra Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा २७ मार्च हा शेवटचा दिवस असल्यामुळं आता राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमधील चर्चेचं गुऱ्हाळ थांबलं आहे. कोणाला कोणती जागा मिळणार, कोण कुठून लढणार आणि कोणत्या पक्षातून लढणार हे सगळं चित्र उद्या संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे.

मागील काही वर्षांत राज्याच्या राजकारणातील समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. अनेक वर्षांपासून असलेली शिवसेना भाजपची युती संपुष्टात आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फुटले आहेत आणि कधी काळी एकमेकांच्या विरोधात त्वेषानं लढणारे पक्ष आता एकमेकांचे मित्र बनले आहेत.

राज्यात सध्या काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असे पाच प्रमुख पक्ष आहेत. त्याशिवाय, वंचित बहुजन आघाडी, शेकाप आणि डावे पक्ष आपापली ताकद काही प्रमाणात राखून आहेत. इतके सगळे पक्ष असल्यानं जागा कमी आणि दावेदार जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या महिनाभरापासून त्यावर काथ्याकूट सुरू आहे.

कोणत्या जागांवरून खेचाखेची?

महायुतीमध्ये नाशिक, सातारा, बारामती, अमरावती, माढा, कोल्हापूर अशा काही जागांवरून तिढा निर्माण झाला आहे. मनसे महायुतीत आल्यास त्या पक्षासाठी देखील महायुतीत जागा करावी लागणार आहे. तर, महाविकास आघाडीची गाडी सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईवर अडली आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडी या प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील पक्षाला कसं सामावून घ्यायचं ही एक वेगळीच डोकेदुखी झाली आहे.

एकनाथ शिंदे व अजित पवारांची चिंता काय?

महायुतीमधील भाजपच्या मित्रपक्षांच्या दृष्टीनं लोकसभेचं जागावाटप अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण, त्यांना पुरेशा जागा न मिळाल्यास तो थेट प्रचाराचा मुद्दा होणार असून त्याचा फटका महायुतीला बसणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत युतीमध्ये असताना शिवसेनेनं १८ जागा जिंकल्या होत्या. एकनाथ शिंदे शिवसेना सोडून गेले तेव्हा त्यांच्यासोबत त्यातील १३ खासदार गेले आहेत. आपणच शिवसेना असल्यानं जिंकलेल्या किमान १८ जागा मिळाव्यात असा शिंदेंचा प्रयत्न आहे. ते न झाल्यास सोबत आलेल्या १३ खासदारांच्या जागा टिकवणं हे शिंदेंपुढं आव्हान आहे. तर, सुनील तटकरे यांच्या रूपानं एकमेव खासदार सोबत असलेल्या अजित पवारांचा किमान चार जागा मिळवण्याचा प्रयत्न आहे.

प्रत्यक्षात वेगवेगळ्या बातम्या येत असल्या तरी पडद्याआड बरंच काही घडत आहे. भाजपनं महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा लढवण्याचं आधीच ठरवलं आहे. मागील वेळी जिंकलेल्या २३ जागांवरील उमेदवार घोषितही करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीनंही उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. ज्या काही थोड्या गोष्टी उरल्या आहेत, त्यावरही उद्या निर्णय होईल, असं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं आहे.

WhatsApp channel