मराठी बातम्या  /  elections  /  Ajit Pawar : 'खावा कुणाचेही मटण, दाबा तुतारीचे बटण', नणंद-भावजयीच्या लढाईत वहिनींची एंट्री, अजित'दादा'ला धक्का

Ajit Pawar : 'खावा कुणाचेही मटण, दाबा तुतारीचे बटण', नणंद-भावजयीच्या लढाईत वहिनींची एंट्री, अजित'दादा'ला धक्का

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 25, 2024 11:58 PM IST

Baramati Loksabha : अजित पवार यांच्या भावानंतर वहिनीही सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात उतरल्या असून तुमचे जे काही अस्तित्व आहे ते शरद पवारांमुळे असल्याचे खडेबोल त्यांनी अजित पवारांना सुनावले आहेत.

बारामतीत नणंद-भावजयीच्या लढाईत वहिनींची एंट्री
बारामतीत नणंद-भावजयीच्या लढाईत वहिनींची एंट्री

राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेची लढत म्हणून बारामती मतदारसंघाकडे पाहिले जात आहे. या मतदारसंघात वेगवान घडामोडी घडत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध त्यांचा भाऊ अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या आहेत. अजित पवार यांच्यामागे भाजपची शक्ती असली तरी पवार कुटूंबात ते एकटे पडताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या भावानंतर वहिनीही सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात उतरल्या असून तुमचे जे काही अस्तित्व आहे ते शरद पवारांमुळे असल्याचे खडेबोल त्यांनी अजित पवारांना सुनावले आहेत.

बारामतीमध्ये होणाऱ्या नणंद भावजयीच्या लढाईकडे राज्याचे लक्ष लागले असताना पवार कुटूंबाने आपले वजन शरद पवारांच्या पारड्यात टाकले आहे. या लढाईत अजित पवार एकटे पडत चालले आहेत. पवार कुटुंबातील आणखी एका सदस्याने नणंदेला साथ देण्याचं ठरवलं असून त्यांच्यासाठी प्रचारातही उतरल्या आहेत.

अजित पवारांचे लहान भाऊ श्रीनिवास पवार यांनी काठेवाडीत अजित पवारांविरोधात भूमिका घेतल्यानंतर आता त्यांच्या पत्नी शर्मिला पवार सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी उतरल्या आहेत. सुप्रिया सुळे नणंद असल्यामुळे त्यांना माझी कायम मदत राहणार असल्याचं शर्मिला पवारांनी जाहीर केलं आहे.

मोठा दीर अजित पवार यांची कानउघडणी करताना शर्मिला पवार म्हणाल्या की, चुलत्याच्या पुढं जायचं नसतं. तू पंतप्रधान हो नाहीतर प्रेसिडेंट हो पण तू चुलत्याच्या पुढं जायचं नाही, वडील तो वडील आणि चुलता तो चुलता मान तो मान, या शब्दात त्यांनी अजित पवारांना टोला लगावला.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या पवार साहेब एकही निवडणूक हरले नाहीत. आपल्याला सुप्रिया सुळे यांना विजयी करायचं आहे. आपल्याकडे एक तीळ सात जणांनी वाटून खायचा असतो. आईवडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा. मात्र, कोणत्याही गोष्टींसाठी आईवडील सोडू नका, असा टोला शर्मिला पवार यांनी अजित पवारांना लगावला.

आपल्याकडे काही लोक प्रचारासाठी बोलवतील अमिष दाखवतील यावर खावा कुणाचेही मटण दाबा तुतारीचे बटण. एक वाटी रस्सा,पाच वर्षे बोंबलत बसा, अशी टीका शर्मिला पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली आहे.

WhatsApp channel