महायुतीमध्ये जागावाटपाचा घोळ सुरू असल्याने भाजप वगळता अन्य घटक पक्षांकडून उमेदवार यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यातच आतानाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असताना आता राष्ट्रवादीही या जागेसाठी मैदानात उतरली आहे.
नाशिकची उमेदवारी मिळवण्यासाठी शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह मुंबई गाठली होती. हेमंत गोडसे यांच्या शक्तीप्रदर्शनानंतर भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले असून नाशिकचे भाजप आमदार आणि पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत.
नाशिक मतदारसंघासाठी शिवसेनेचे हेमंत गोडसे यांचं नाव चर्चेत असताना आता या जागेसाठी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळही पुढं सरसावले आहेत. या जागेवर शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादीने दावा केल्याने मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. यासाठी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नाशिकची जागा समीर भुजबळ यांना सोडण्याची मागणी केल्याचे समजते
राष्ट्रवादीनं नाशिक जागेवर दावा सांगितल्याने शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नाशिकच्या पालकमंत्र्यांसह आमदार, नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी थेट ‘वर्षा’ गाठून ही जागा शिवसेनेकडेच ठेवावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू असतानाच आता मनसेही या जागेवर दावा केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्याने महायुतीत चौथा भिडू सामील होणार असल्याची चर्चा रंगली आहे. या भेटीत मनसेने नाशिकच्या जागेची मागणी केल्याचे समजते. मनसेच्या भूमिकेने नाशिकवरून संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. त्यामुळे नाशिकची जागा महायुतीत नक्की कोणाला सुटणार? याची उत्सुकता लागली आहे.