मराठी बातम्या  /  elections  /  madha lok sabha : महादेव जानकर महायुतीत गेले! माढ्यात आता शरद पवार कोणाला चाल देणार?

madha lok sabha : महादेव जानकर महायुतीत गेले! माढ्यात आता शरद पवार कोणाला चाल देणार?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 25, 2024 01:04 PM IST

Madha lok Sabha Election 2024 : महायुतीमधील कुरबुरींमुळं सध्या चर्चेत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात आता शरद पवार नवा मोहरा उतरवण्याच्या तयारीत आहेत.

महादेव जानकर महायुतीत गेले! माढ्यात आता शरद पवार काय डाव टाकणार?
महादेव जानकर महायुतीत गेले! माढ्यात आता शरद पवार काय डाव टाकणार?

Madha Lok Sabha Constituency : माढा लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारीची चर्चा असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे महायुतीच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळं आता महाविकास आघाडीवर नवा उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. शरद पवार आता इथं कोणता डाव टाकतात याविषयी चर्चा सुरू झाली आहे. पवारांनी इथून एक मोहरा हेरून ठेवल्याचीही चर्चा आहे.

महायुतीमधील विसंवादामुळं सध्या माढा लोकसभा मतदारसंघ भलताच चर्चेत आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे इथले विद्यमान खासदार असून भाजपनं पुन्हा एकदा त्यांना संधी दिली आहे. त्यामुळं नाराजीची लाट आहे. सोलापुरात दबदबा असलेल्या मोहिते पाटील घराण्यानं धैर्यशील मोहिते पाटील यांना पुढं केलं आहे. तर, महायुतीसोबत असलेले रामराजे निंबाळकर यांनीही सध्याच्या उमेदवाराला विरोध केला आहे.

या परिस्थितीचा फायदा उचलण्यासाठी शरद पवारांनी महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना रिंगणात उतरवण्याचा विचार सुरू केला होता. माढा मतदारसंघ हा सोलापूर आणि सातारा अशा दोन्ही जिल्ह्यात पसरलेला आहे. साताऱ्यातही शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. तर, सोलापूर भागात धनगर समाजाचे मतदार मोठ्या संख्येनं आहेत. हे गणित बांधून पवारांनी जानकर यांच्याशी चर्चा सुरू केली होती. मात्र, ते महायुतीच्या गोटात गेले आहेत. तिथं रणजितसिंह यांना माघार घ्यायला लावून जानकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

प्रा. रघुनाथ पाटील यांचं नाव चर्चेत

महादेव जानकर हे महायुतीसोबत जाताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रा. रघुनाथ पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. रघुनाथ पाटील हे सांगोल्याचे माजी आमदार व शेकाप नेते गणपतराव देशमुख यांचे शिष्य आहेत. शरद पवारांचे ते विश्वासू कार्यकर्ते आहेत. त्याचबरोबर धनगर समाजात कार्यरत असलेल्या यशवंत सेनेचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत. गेल्या २० वर्षांपासून ते धनगर समाजात काम करत आहेत.

महायुतीनं जानकर यांना रिंगणात उतरवल्यास शरद पवारांकडून पाटील यांना चाल दिली जाऊ शकते. तसं झाल्यास धनगर मते महाविकास आघाडीकडं खेचता येतील. त्याशिवाय, शरद पवारांना मानणारी मराठा मतंही पाटील यांच्या पारड्यात पडू शकतात, असाही एक अंदाज बांधला जात आहे.

महाविकास आघाडीची आज निर्णायक बैठक

महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी होत आहे. या बैठकीत वादग्रस्त जागांवर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्यानंतर उद्यापर्यंत महाविकास आघाडीचे सर्व पत्ते उघड होतील अशी अपेक्षा आहे. त्यात माढ्यातून कोणाचं नाव असेल याबाबत उत्सुकता आहे.

WhatsApp channel