कर्नाटक राज्यातील मंत्र्याने निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. कोप्पल येथे निवडणूक प्रचार सभेत कर्नाटकचे मंत्री आणि काँग्रेस मंत्री शिवराज एस तंगदागी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी एक सभेला संबोधित करताना म्हटले की, पंतप्रधान मोदींनी कोट्यवधी तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी नोकऱ्या दिल्या का? त्यांना पुन्हा मते मागताना लाज वाटली पाहिजे. त्यांचा समर्थक तरुणवर्ग जो 'मोदी-मोदी' च्या घोषणा देतो त्यांच्या कानाखाली आवाज काढला पाहिजे.
कोप्पल जिल्ह्यातील करातगी येथे काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत बोलताना शिवराज तंगदागी म्हणाले की, मागील १० वर्षात खोटी आश्वासने देऊन कारभार केला आहे. त्यामुळे त्यांना वाटते की, पुढच्या पाच वर्षातही जनतेला मूर्ख बनवले जाऊ शकते. मोदींनी देशात १०० स्मार्ट शहरांचे आश्वासन दिले होते. ते कुठे आहेत? एका शहराचे नाव सांगा. ते स्मार्ट आहेत, चांगले कपडे परिधान करतात, वक्तृत्व चांगले आहे, ते आपला पोशाख सतत बदलत राहतात. कधी कधी त्यांचे स्टंट समोर येतात. कधी ते समुद्राच्या तळाशी जातात व तेथे पूजा करतात. एका पंतप्रधानाने अशी कामे करावी का?
भाजप विकासकामातही अपयशी ठरली आहे. त्यामुळे या निवडणुकीत मते मागतानाही त्यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी एकही विकासकाम पूर्ण केले नाही. त्यांच्या काळात बेरोजगारी वाढली आहे. त्यांनी नोकरी मागताना ते पकोडे विकण्याचा सल्ला देतात.
दरम्यान भाजपाचे वरिष्ठ नेते व पक्षाचे माजी राष्ट्रीय महासचिव सी टी रवी यांनी यावर पलटवार केला आहे. त्यांनी म्हटले की, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा खूपच वाईट पराभव होणार आहे. याची काँग्रेस नेत्यांना जाणील आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पातळी सोडून वक्तव्ये होत आहेत व तेच मोदींना हुकूमशहा म्हणतात.
काँग्रेस मंत्र्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपने निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे. निवडणूक आयोगात याचिका दाखल करून भाजपने मंत्री शिवराज एस तंगदागी यांच्यावर आचारसंहिता उल्लंघन प्रकरणा कारवाईची मागणी केली आहे.