Jayant Patil taunts Mahayuti : लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्याप राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटप आणि उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. मात्र, विजयाचा विश्वास दोन्हीकडून व्यक्त होत आहे. भाजपप्रणित महायुतीनं तर ४५ प्लस जागा जिंकण्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते जयंत पाटील यांनी महायुतीच्या या दाव्याची खिल्ली उडवली आहे.
ते पत्रकारांशी बोलत होते. ‘कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास टिकवण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करतो. कोल्हापुरात फिरल्यावर ४५ मधील एक जागा तिथंच कमी झाल्याचं तुम्हाला दिसेल. थोडंसं पुढं गेलं तर साताऱ्यात तीच परिस्थिती आहे. त्यामुळं महायुतीला ४५ पेक्षा जास्त मिळतील का हे माझ्यापेक्षा जास्त पत्रकार सांगू शकतील,’ असं जयंत पाटील म्हणाले.
धनगर समाज नाराज आहे. हा समाज त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत देईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. धनगर समाजाच्या आरक्षणाला आरएसएस प्रणित वनवासी कल्याण आश्रम या संस्थेनं न्यायालयात आव्हान दिलंय हा नाना पटोले यांचा आरोप योग्यच आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी आमच्यासोबत लढावेत अशी आमची इच्छा होती. मात्र त्यांचा वेगळा पवित्रा दिसतोय. शिवसेनेच्या नेत्यांशी त्यांची चर्चाही झाली होती. शेट्टी हे आमच्यासोबत धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी होतील असं आम्हाला वाटलं होतं. पण सध्याचं चित्र तसं दिसत नाही. शेट्टी यांनी पाठिंबा घेतला नाही तर आम्हाला उमेदवार उभा करावाच लागेल,' असं पाटील यांनी सांगितलं.
‘वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत यावी असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यावर लवकरात लवकर निर्णय होईल, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. ‘महादेव जानकर यांना शरद पवार साहेबांनी माढ्यातून उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. मात्र त्याचा वेगळा निर्णय झाला आहे. त्यामुळं तिथं आम्हाला दुसरा उमेदवार द्यावा लागेल,’ असं जयंत पाटील म्हणाले.
सांगलीच्या जागेवरून शिवसेना व काँग्रेसमध्ये असलेल्या मतभेदांवर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असंही पाटील यांनी सांगितलं.