Lok Sabha Election 2024 dates tomorrow : देशातील सर्वच राजकीय पक्षांना आणि जनतेलाही प्रतीक्षा असलेल्या लोकसभा निवडणुकांची घोषणा उद्या, १६ मार्च रोजी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज ही माहिती दिली.
निवडणूक आयोगाच्या (Election Commission) प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाबरोबरच देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचीही शनिवारी घोषणा होणार आहे. ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
ही घोषणा होताच निवडणूक आचारसंहिता लागू होणार आहे. राजकीय पक्ष, उमेदवार, सरकार आणि सत्ताधारी पक्षांना त्यानुसारच आपलं वर्तन ठेवावं लागणार आहे. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून रोजी संपत असून त्यापूर्वी नव्या सभागृहाची स्थापना करावी लागणार आहे. याआधी २०१९ साली १० मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली होती आणि ११ एप्रिलपासून सात टप्प्यात मतदान झाले होते. २३ मे रोजी मतमोजणी झाली.
अनुपचंद्र पांडे यांची निवृत्ती आणि मागील आठवड्यात अरुण गोयल यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळं निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्तपदाच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच निवडणूक आयोगानं ही घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं गुरुवारी या दोघांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच देशभरातील राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. सत्ताधारी भाजप व प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसह बहुतेक पक्षांनी उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली आहे. तर, काही राज्यांतील युत्या आणि आघाड्यांमधील पक्षांची जागावाटपाची चर्चा अखेरच्या टप्प्यात आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानं काही उमेदवार जाहीर केले आहेत. तर, महायुतीमधील भाजपनं महाराष्ट्रातील २० उमेदवार जाहीर केले आहेत. इतर पक्षही लवकरच आपले पत्ते उघडतील अशी शक्यता आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर या सगळ्याला खऱ्या अर्थानं वेग येणार आहे. देशात एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये जोरदार टक्कर होणार आहे.