मराठी बातम्या  /  elections  /  south mumbai lok sabha : ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईतील एकमेव खासदार पाडण्यासाठी भाजपची खेळी; 'ती' जागा मनसेला सोडणार

south mumbai lok sabha : ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईतील एकमेव खासदार पाडण्यासाठी भाजपची खेळी; 'ती' जागा मनसेला सोडणार

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 14, 2024 01:18 PM IST

Lok Sabha Election 2024 : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यासाठी भाजपनं मनसेला बळ देण्याची रणनीती आखल्याचं समजतं.

ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईतील एकमेव खासदार पाडण्यासाठी भाजपची मोठी खेळी; मनसेला जागा सोडणार?
ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईतील एकमेव खासदार पाडण्यासाठी भाजपची मोठी खेळी; मनसेला जागा सोडणार?

South Mumbai Lok Sabha Election News : 'अब की बार, ४०० पार'चा निर्धार करणाऱ्या भाजपनं देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. मुंबईतून महायुतीचे सर्वच्या सर्व खासदार निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न असून त्यासाठी मनसेला सोबत घेण्याचा विचार सुरू आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ राज ठाकरे यांच्या मनसेला सोडला जाण्याची शक्यता आहे.

शिवसेना व भाजपची जुनी युती तुटल्यापासून भाजपनं शिवसेनेला राजकीयदृष्ट्या नामोहरम करण्याची मोहीच उघडली आहे. शिवसेनेत फूट पाडून भाजपनं उद्धव ठाकरे यांना पहिला धक्का दिला होता. मात्र, त्यानंतरही ठाकरे यांची शिवसेना पुन्हा जोमानं काम करत असल्यानं भाजपनं आणखी मनसेलाही सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

मुंबईतील लोकसभेच्या सहा जागा केवळ केंद्रातील सत्तेसाठीच नव्हे तर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका आणि महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनंही अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सध्या मुंबईत भाजपचे तीन खासदार आहेत. तर, मूळ शिवसेनेचे तीन खासदार आहेत. त्यापैकी दोन खासदार सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत, म्हणजेच भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीत आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या सोबत अरविंद सावंत हे एकमेव खासदार आहेत. सावंत हे सध्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. सावंत हे कामगार नेते असून तळागाळात त्यांचा संपर्क आहे. शिवाय, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात येणारा भाग हा मराठीबहुल आहे. येथील मतदारांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा पगडा आहे. प्रत्येक संकटाच्या काळात इथल्या मतदारांनी शिवसेनेला साथ दिली आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील सहा आमदारांपैकी तीन आमदार महायुतीचे आहेत आणि तीन महाविकास आघाडीचे आहेत. भाजपनं इथं राहुल नार्वेकर यांच्या रूपानं मराठी उमेदवार देण्याचा विचार सुरू केला आहे. मात्र, हा मतदारसंघ एकट्याच्या बळावर जिंकणं हे भाजपसाठी सोपं नाही. त्यामुळं तो मनसेसाठी सोडावा किंवा अप्रत्यक्ष मनसेची मदत घ्यावी असा भाजपचा प्रयत्न आहे. त्याबाबत पडद्यामागे बऱ्याच वाटाघाटी सुरू असल्याचं सूत्रांकडून समजतं.

जागा सोडणार की मदत घेणार?

मनसेशी थेट युती करून भाजप दक्षिण मुंबईची जागा सोडणार की भाजपचाच उमेदवार उतरवून मनसेची मदत घेणार याविषयी अनिश्चितता आहे. राज ठाकरे हे आजवर नेहमीच स्वबळाची भाषा करत आले आहेत. फोडाफोडीच्या व दगाबाजीच्या राजकारणावर टीका करत आले आहेत. भाजप, शिंदे आणि अजित पवारांसोबत गेल्यास त्यांच्यावर पुन्हा भूमिका बदलल्याचा ठपका बसेल. त्यामुळं राज ठाकरे थेट युती न करता मदत करण्याची भूमिका घेऊ शकतात. त्या बदल्यात विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत भाजपची मदत घेऊ शकतात, अशीही एक चर्चा आहे.

 

WhatsApp channel