Parth Pawar Y Plus Security : राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रत्येक उमेदवार, त्यांचे पक्ष प्रमुख आणि कार्यकर्ते निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांवर सुरक्षेचा मोठा ताण आहे. मात्र, असे असतांना देखील राज्य सरकार मात्र, उपूमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिरंजीवावर मेहरबान झाले आहे. पार्थ पवार हे त्यांची आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात व्यस्त असल्याने त्यांना वाय पल्स सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विरोधकांनी त्यांना धारेवर धरले आहे.
लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार निवडून यावे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रचार यंत्रणा कार्यान्वित केली आहे. बारामती मतदार संघाच्या निवडणुकीकडे सर्व देशाचे लक्ष लागून आहे. या मतदार संघात अजित पवार राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी जोरदार प्रचारसभा घेत आहेत. यात त्यांचे पुत्र पार्थ पवार हे देखील त्यांच्या सोबतीला उतरले असून त्यांच्या आईचा जोरदार प्रचार ते बारामती लोकसभा मतदार संघात करतांना दिसत आहेत. दरम्यान, प्रचार सभेत फिरत असतांना पार्थ पवार यांच्या सुरक्षेसाठी त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय राजू सरकारने घेतला आहे. चार दिवसांपूर्वीच राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. सध्या पार्थ पवार हे त्यांच्या आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहे. या साठी ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असून नगरिकांशी देखील संवाद साधत आहेत. त्यामुळेच सुरक्षेच्या दृष्टीने पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
बारामती लोकसभा मतदार संघात सध्या सुप्रिया सुळे विरोधात अजित पावर यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत पवार कुटुंब हे विभागले गेलेले दिसते. युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या गटात असून ते सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत आहेत. मात्र प्रचारादरम्यान, त्यांना काही नागरिकांनी घेराव घातला होता. अजित पवारांच्या नावावरून काही चुकीचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचा दावा त्यांनी केला होता. यामुळे सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र पवार तसेच रोहित पवार यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. मात्र, या मागणीनंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, आता पार्थ पवार यांना वाय पल्स सुरक्षा देण्यात आल्याने शरद पवार गटाकडून सरकारच्या या निर्णयावर टीका केली जात आहे. एकीकडे पुणे पोलीस आयुक्तांनी निवडणूकीच्या काळात महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढली असतांना राज्य शासनाने मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चिरंजीवांना वाय प्लस सुरक्षा दिल्याने सरकारच्या दुटप्पी धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.