Sanjay Singh allegations on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २४ तास सीसीटीव्हीद्वारे तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्यावर नजर ठेवत आहेत. दिल्लीच्या नायब राज्यपालांचं कार्यालय सुद्धा याच कामात दंग आहे, असा खळबळजनक आरोप आम आदमी पक्षानं केला आहे.
‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठे गौप्यस्फोट केले. 'मी आज जे सत्य सांगणार आहे ते ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. दिल्लीतील तिहार तुरुंग अरविंद केजरीवाल यांच्यासाठी टॉर्चर चेंबर बनला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री रोज तिहार तुरुंगात झाडू मारतात. हिटलर सुद्धा त्याच्या विरोधकांसाठी टॉर्चर चेंबर बांधायचा. आज तेच घडत आहे, असं संजय सिंह म्हणाले.
'पंतप्रधान कार्यालय आणि नायब राज्यपालांचं कार्यालय तिहार तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्यावर २४ तास पाळत ठेवून आहे. नरेंद्र मोदी हे व्हिडिओ मागवून केजरीवाल काय करतात याची माहिती घेतात. एवढी पाळत का ठेवली जातेय? तुम्हाला काय पाहायचं आहे? अरविंद केजरीवाल यांना औषध मिळालं की नाही? जेवण मिळालं की नाही? त्यांनी किती वाचन केलं? किती लिखाण केलं? तुम्हाला पाहायचं काय आहे? पंतप्रधानांना २४ तास सीसीटीव्ही लिंक का लागते? अरविंद केजरीवाल किती आजारी आहेत, त्यांची तब्येत बिघडली की नाही? ते कोलमडून पडलेत का, हे पाहायचं आहे. नायब राज्यपालही दिल्लीचं काम सोडून अरविंद केजरीवाल यांना किती यातना दिल्या जातात हे पाहण्यात ते व्यग्र आहेत, असं संजय सिंह म्हणाले.
'केजरीवालांशी स्पर्धा करायची असेल तर कामातून करा. शाळा आणि रुग्णालयं बांधा. रस्ते बांधा... महागाई कमी करा. महिलांच्या सुरक्षेसाठी काम करा. तुम्ही शेतकरी, महिला आणि तरुणांची काळजी करावी. पण तुम्ही केजरीवालांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा खटाटोप करत आहात. संपूर्ण देश तुमचा हा अत्याचार पाहत आहे. अरविंद केजरीवाल रोज तुरुंगात झाडू मारत आहेत. केजरीवाल जेवढा झाडू मारतील, तेवढा भाजप साफ होईल. संपूर्ण देशातून भाजपचा सुपडासाफ होईल. ही घबराट त्याचंच द्योतक आहे, असा टोलाही संजय सिंह यांनी हाणला.
'सर्व नियम आणि कायदे मोडून पंतप्रधान कार्यालय व नायब राज्यपालांचं कार्यालय अरविंद केजरीवाल यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची लिंक मागवून पाहत आहेत. त्यामुळंच केजरीवालांच्या विरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचं आम्हाला वारंवार सांगावं लागत आहे. त्यांच्यासोबत अनुचित घटना घडू शकते. तसं झाल्यास त्यासाठी थेट पंतप्रधान कार्यालय आणि एलजी जबाबदार असतील, असा इशारा संजय सिंह यांनी दिला.