क्रिकेट विश्वचषक २०२३ येत्या ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरू होत आहे. विश्वचषकातील पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंडमध्ये गुजरातमधील अहमदाबाद इथं रंगणार आहे. यंदाची विश्वचषक स्पर्धा क्रिकेटच्या इतिहासातील १३ वी स्पर्धा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) वतीनं दर चार वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जाते. यावेळी ही स्पर्धा भारतात होत आहे. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेतील विजेता संघ इंग्लंडसह १० संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. १९८७, १९९६ आणि २०११ मध्ये भारतीय उपखंडातील इतर देशांसोबत भारतानं या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. मात्र, संपूर्ण विश्वचषक स्पर्धेचं आयोजन भारतात होण्याची ही पहिलीच वेळ आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर २०२३ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियम आणि कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवले जातील. ही स्पर्धा ९ फेब्रुवारी ते २६ मार्च २०२३ या कालावधीत होणार होती. मात्र, कोविडच्या संभाव्य संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानंतर, जुलै २०२० मध्ये ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये विश्वचषक घेण्याची घोषणा करण्यात आली. आयसीसीनं २७ जून २०२३ रोजी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.
पाकिस्तानात होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला पाठवण्यास भारतीय क्रिकेट बोर्डाने नकार दिला होता. त्यामुळं वाद निर्माण झाला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (पीसीबी) विश्वचषक स्पर्धेवर बहिष्कार घालण्याची टोकाची भाषा केली होती. आशियाई क्रिकेट परिषदेनं जून २०२३ मध्ये यावर मध्यममार्ग काढत आशिया कप पाकिस्तान व श्रीलंकेत संयुक्तपणे खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा वाद संपुष्टात आला. आशिया कप क्रिकेटमधील १३ पैकी नऊ सामने श्रीलंकेत खेळले जात आहेत. आशिया चषक क्रिकेट स्पर्धा ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. मागील विश्वचषकाप्रमाणेच यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत १० संघ सहभागी होणार आहेत. आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगच्या माध्यमातून पात्र संघ निवडण्यात आले आहेत. सुपर लीगमधील १३ पैकी अव्वल आठ संघ आपोआप विश्वचषकासाठी पात्र ठरतात.
भारत हा आयसीसी क्रमवारीत सहाव्या स्थानी असल्यामुळं भारताचं स्थान निश्चित होतं. आठ संघ आपोआप पात्र ठरल्यानंतर उर्वरित दोन संघ निवडण्यासाठी क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा घेण्यात आली. नेदरलँड्स आणि श्रीलंकेनं उत्तम कामगिरी करत वर्ल्ड कपमध्ये प्रवेश केला. पात्रता फेरीत अपेक्षित कामगिरी करू न शकल्यानं क्रिकेट जगतावर एकेकाळी अधिराज्य गाजवणारा वेस्ट इंडिजचा संघ अपात्र ठरला. वेस्ट इंडिजला स्कॉटलंडविरुद्धच्या पराभवाचा मोठा फटका बसला. वेस्ट इंडिजच्या संघाशिवाय होत असलेली क्रिकेटची ही पहिलीच विश्वचषक मालिका असेल. आयर्लंड आणि झिम्बाब्वे हे संघ देखील पात्र ठरले नाहीत. बाद फेरीत प्रवेश केलेल्या केवळ श्रीलंकेला विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळाले. एलिमिनेटर राउंड स्कॉटलंड व नेदरलँड्समध्ये झाला. नेदरलँड्सने एलिमिनेटर स्पर्धा जिंकून विश्वचषकात धडाक्यात प्रवेश केला.
विश्वचषक स्पर्धेच्या सुविधांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून बीसीसीआनं प्रत्येक स्टेडियमच्या डागडुजीसाठी ५० कोटी रुपये दिले आहेत. वानखेडे स्टेडियमच्या आऊटफिल्डचं नुतनीकरण करण्यात आलं आहे. फ्लडलाइट्स एलईडी लाईट्स अद्ययावत करण्यात आल्या आहेत. स्वच्छतागृहांचीही सुधारणा करण्यात आली आहे. चिदंबरम स्टेडियमवर नवीन फ्लडलाइट्स लागले आहेत. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथील आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियम आणि तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे २९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान सराव सामने होणार आहेत. या सामन्यांचं टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपण केलं जाईल.
क्रिकेट विश्वचषक २०२३ भारतातील विविध शहरांमध्ये होणार आहे
विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्याची ही भारताची कितवी वेळ आहे?
संपूर्ण विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी आशिया खंडात झालेल्या विश्वचषक स्पर्धांचा भारत सह-आयोजक होता.
भारत २०२३ आशिया कप जिंकेल का?
भारतीय संघाने आतापर्यंत १९८३ आणि २०११ साली, असा दोनदा विश्वचषक जिंकला आहे. यावेळी देखील भारताचा संघ बलाढ्य असल्यानं तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची संधी आहे
यावेळचा विश्वचषक कोणत्या फॉरमॅटमध्ये असेल?
यावेळचा विश्वचषक ५० षटकांच्या (One day) फॉरमॅटमध्ये होणार आहे