जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाची सर्वात महागडी T20 लीग म्हणून इंडियन प्रीमियर लीगचा BCCI ला खूप गर्व आहे. जागतिक क्रिकेटमधील सर्वच मोठे स्टार्स वर्षभर या स्पर्धेची वाट पाहत असतात. खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडतो. उदघाटन आणि समारोप समारंभात पैसा पाण्यासारखा ओतला जातो. तसेच, यास्पर्धेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो, याचा गवगवाही बीसीसीआय करते.
सामन्याच्या ३६० डिग्री अँगल कव्हरेजसाठी, मैदानावर ३०-३५ कॅमेरे बसवले असतात, तसेच, ८ हॉकआय कॅमेरा टेक्नोलॉजीही यंदापासून सुरू करण्यात आली आहे. झटपट निर्णय घेण्यासाठी पंचांची फौज आहे. पण असे असूनही, आयपीएल २०२४ मध्ये काल (७ मे) रात्री जे घडले ते अतिशय लज्जास्पद होते.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हाय स्कोअरिंग सामना खेळला गेला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने स्कोअरबोर्डवर ८ गडी गमावून २२१ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने जबरदस्त पलटवार केला.
संजू सॅमसन सुरुवातीपासूनच चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने २८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या ५ षटकांत रॉयल्सला विजयासाठी ६३ धावांची गरज होती. सामन्याच्या या नाजूक वळणावर पंचांनी एक नव्हे तर दोन मोठ्या चुका केल्या. जेव्हा सामना शेवटच्या आणि चुरशीच्या टप्प्यात येतो तेव्हा अंपायरिंगही तितक्याच काळजीने करायला हवी.
राजस्थानच्या डावातील १६व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बराच ड्रामा झाला. वास्तविक या षटकाची जबाबदारी वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याच्यावर होती. पहिल्या ३ चेंडूत केवळ ३ धावा दिल्यानंतर मुकेशने चौथा चेंडू स्टंपच्या आऊट साइडला स्लोअर टाकला. सॅमसनने हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मारला, हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार जाणार इतक्यात, अचानक शाई होप धावत आला आणि झेल घेतला.
हा झेल चांगलाच वादग्रस्त ठरला. संजूला थर्ड अंपायरने बाद दिले. पण हा झेल अंपायरने रिप्लेत फक्त एकदाच पाहिला आणि एकाच अँगलने पाहिला. त्यामुळे क्रिकेट चाहते चांगलेच नाराज झाले आहेत.
वाईड बॉलचा रिव्ह्यू घेतल्यानंतर अंपायर सर्वच अँगलचा वापर करतात. पण संजू सॅमसनबाबत असे झाले नाही. केवळ एकदाच आणि एकाच अँगलने झेल पाहून संजूला बाद देण्यात आले.
काही क्रिकेट समिक्षकांच्या आणि चाहत्यांच्या मते संजू सॅमसन नॉट आऊट होता. काही जणांनी तर शाय होपच्या पायांचा स्पर्ष होऊन सीमारेषेवरील कुशन हलल्याचेही सांगितले आहे.
पंचांनी शहानिशा न करता संजू सॅमसनला आऊट दिले. संजू आधी अर्ध्या वाटेपर्यंत परत गेला आणि नंतर परत आला आणि पंचांशी बोलू लागला. राजस्थानच्या डगआऊटमध्येही मोठा गोंधळ उडाला होता. संजूला डीआरएस घ्यायचा होता, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
अशा स्थितीत प्रश्न पडतो की, आपल्याकडे महागडे आणि उच्च तंत्रज्ञान असताना, अशा निर्णायक क्षणी असे निर्णय कसे काय दिले जाऊ शकतात?
दरम्यान, या सामन्यातील पंचांचा निष्काळजीपणा इथेच थांबला नाही. असाच खराब निर्णय १९व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाला. रॉव्हमन पॉवेल फलंदाजी करताना वेगवान गोलंदाज रसिक सलाम दारने ऑफ साइडच्या बाहेर चेंडू रोटाकला, जो नियमानुसार वाइड द्यायला हवा होता, परंतु पंचांच्या मते तो लीगल चेंडू होता.
पॉवेलने लगेच रिव्ह्यू घेतला. रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आले की पॉवेलने तो खेळण्यासाठी गुडघे टेकून शॉट मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू खूप दूर आणि बाहेर होता. अनेक वेळा रिप्ले पाहिल्यानंतरही तिसऱ्या पंचांनी वाइड दिला नाही.
या डॉट बॉलनंतर राजस्थानला शेवटच्या षटकात विजयासाठी २९ धावांची गरज होती. पॉवेल दबावात बाद झाला आणि राजस्थान विजयापासून २० धावा दूर राहिला.