आयपीएल २०२४ दरम्यान बीसीसीआयने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनवर मोठी कारवाई केली आहे. राजस्थान रॉयल्सचा ७ मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामना झाला. या सामन्यात संजू सॅमसन पंचांशी वाद घालताना दिसला. त्याच्या विकेटनंतर तो खूप संतापलेला दिसत होता. संजू सॅमसनच्या या वर्तनावर बीसीसीआयने कारवाई केली आहे.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन ४६ चेंडूत ८६ धावा करून बाद झाला. या खेळीत संजू सॅमसनने ८ चौकार आणि ६ षटकार मारले. पण १६व्या षटकात तो झेलबाद झाला. त्याने मुकेश कुमारच्या चेंडूवर मोठा फटका मारला, पण बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या शाई होपने झेल घेत संजू सॅमसनचा डाव संपवला. तिसऱ्या पंचाने त्याला बाद घोषित केले. पण बाद झाल्यानंतर तो पंचांशी वाद घालताना दिसला.
अशा परिस्थितीत आता बीसीसीआयने पंचांच्या निर्णयाशी असहमती दाखवल्याबद्दल संजू सॅमसनच्या मॅच फीच्या ३० टक्के दंड ठोठावला आहे. याआधी विराट कोहलीलादेखील अशाप्रकारचा दंड झाला होता
बीसीसीआयने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून संजू सॅमसनला दंड ठोठावला आहे. प्रेस रिलीझ BCCI ने म्हटले आहे की राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आयपीएल २०२४ च्या ५६ व्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या ३० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. सॅमसनने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.८ अंतर्गत लेव्हल १ चा गुन्हा केला आहे. त्याने गुन्हा कबूल केला आहे. आचारसंहितेच्या स्तर १ भंगासाठी, सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.
याआधी विराट कोहलीलाही पंचांशी वाद घातल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान विराट कोहली पंचांशी वाद घालताना दिसला. तो फुल टॉस बॉलवर बाद झाला. हा चेंडू कमरेच्या वरचा आहे, असे विराटचे म्हणणे होते. मात्र पंचांनी त्याला बाद घोषित केले. त्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वी त्याने पंचांशी वाद घातला. त्यामुळे बीसीसीआयने विराट कोहलीला मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावला होता.
संबंधित बातम्या