आयपीएलमध्ये एखाद्या कर्णधाराने, कोचने किंवा खेळाडूने आपला संयम गमावून मैदानावरील पंच किंवा टीव्ही अंपायरच्या निर्णयावर राग व्यक्त करणे ही एक सामान्य घटना आहे, परंतु मंगळवारी (७ मे) रात्री जे घडले त्याने सर्वांनाच विचार करायला भाग पाडले आहे.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान, दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीचे सह-मालक पार्थ जिंदाल यांनी चक्क खेळाडूंच्या वादात उडी घेतली. यावरून नवा वाद निर्माण झाला आहे आणि पार्थ जिंदाल अतिशय वाईटरित्या ट्रोल होताना दिसत आहेत.
वास्तविक, दिल्लीच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सच्या १६व्या षटकात ही घटना घडली. कर्णधार संजू सॅमसनने मुकेश कुमारच्या चेंडूवर एक धारदार शॉट मारला, चेंडू थेट सीमारेषेपर्यंत गेला, पण अचानक लॉंग ऑनवर थांबलेला शाई होप धावात आला आणि त्याने झेल घेतला. हा झेल चांगलाच वादग्रस्त ठरला.
पण थर्ड अंपायरने संजूला बाद घोषित केले. पंचांच्या या निर्णयामुळे संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्स चांगलेच संतापले. कारण थर्ड अंपायरने हा झेल रिप्लेत फक्त एकदाच पाहिला आणि एकाच अँगलने पाहिला. त्यामुळे क्रिकेट चाहते आणि राजस्थान रॉयल्सचा संघ चांगलेच नाराज झाले.
संजू सॅमसन थर्ड अंपायरने बाद दिल्यानंतर मैदानाबाहेर जात होता. पण मोठ्या पडद्यावर रिप्ले पाहिल्यानंतर तो परत फिरला. कारण रिप्लेत पाहिल्यानंतर आपण नॉट ऑऊट आहोत, असे संजूला वाटले.
पण थर्ड अंपायरने संजूला बाद दिले. सॅमसनने मैदानावरील पंचांकडे या निर्णयाबाबत आक्षेप घेतला आणि पंचांशी बोलू लागला. पण तेवढ्यात पार्थ जिंदाल यांनी त्याच्यावर 'आऊट इज आउट' असे ओरडण्यास सुरुवात केली. जिंदाल यांच्या वागण्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.
यानंतर सॅमसन नाराज झाला त्याला अनिच्छेने पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. संजूने ४६ चेंडूंत ८ चौकार आणि ६ षटकारांसह ८६ धावांची शानदार खेळी केली.