लखनौ सुपर जायंट्सला बुधवारी (८ मे) सनरायझर्स हैदराबादकडून १० गडी राखून पराभव पत्करावा लागला. ऑरेंज आर्मीविरुद्धच्या दारुण पराभवानंतर लखनौ फ्रँचायझीचे मालक संजीव गोयंका खूपच निराश आणि संतापलेले दिसले. या सामन्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये गोएंका स्टेडियममध्येच केएल राहुलवर ओरडताना दिसत होते.
मात्र, फ्रँचायझीचे मालक आणि खेळाडू यांच्यात वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. खेळाडू आणि मालक असे वाद हे यापूर्वीही झाले आहेत. आपण येथे अशाच काही वादांचा आढावा घेणार आहोत.
डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने २०१६ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतरही वॉर्नरने संघासाठी चांगली कामगिरी सुरूच ठेवली होती. पण आयपीएल २०२१ दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद फ्रेंचायझीने वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून टाकले आणि सोबतच त्याला प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले. फ्रेचायझी एवढ्यावर न थांबली नाही तर त्यांनी वॉर्नरला सोशल मीडियावर ब्लॉकही केले.
चेन्नई सुपर किंग्जने २०२२ च्या आयपीएल हंगामापूर्वी रवींद्र जडेजाला कर्णधार म्हणून नियुक्त केले होते. मात्र त्या मोसमात जडेजाच्या नेतृत्वात सीएसेकचे सलग पराभव झाले. अशा स्थितीत फ्रेंचायझीने चालू मोसमात जडेजाचे कर्णधारपद काढून घेतले.
यानंतर जडेजाने संघातूनही माघार घेतली. २०२३ च्या सीझनपूर्वी जडेजाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चेन्नईचे सर्व फोटो हटवले होते. मात्र, महेंद्रसिंग धोनीच्या मध्यस्थीमुळे जडेजा पुन्हा संघात आला.
सौरव गांगुली आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील वाद २००९ च्या हंगामातच सुरू झाला होता. संघाचे प्रशिक्षक जॉन बुकानन यांनी अनेक कर्णधारांचे धोरण आणले होते. पण गांगुलीला हे आवडले नाही. अशा स्थितीत २०१० च्या हंगामानंतर केकेआरने गांगुलीला रीलीज केले. त्यावेळी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले की शाहरुखला गांगुलीची काम करण्याची पद्धत आवडली नाही.
सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्जचा अविभाज्य भाग होता. पण २०२० चा हंगाम सुरू होण्यापूर्वी तो दुबईतून लीग अर्ध्यात सोडून भारतात परतला. फ्रँचायझीने याचे कारण सांगितले नाही. पण सुत्रांच्या माहितीनुसार, रैनाने फ्रँचायझीसोबतच्या मतभेदांमुळे लीगमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.
रॉस टेलरचे प्रकरण या सगळ्यांपेक्षा खूप वेगळे आहे. न्यूझीलंडच्या या फलंदाजाने निवृत्तीनंतर लिहिलेल्या पुस्तकात या वादाचा खुलासा केला आहे. टेलरच्या म्हणण्यानुसार, फ्रँचायझीच्या सहमालकाने त्याला थप्पड मारली होती. कारण तो शून्यावर बाद झाला होता. “आम्ही शून्यावर आऊट होण्यासाठी तुला करोडो रुपये देत नाही”, असे टेलरला मालकाने म्हटले होते.