सध्या आयपीएल २०२४ चा थरार सुरू आहे आणि या स्पर्धेतील संघ मोठ-मोठ्या धावसंख्या उभारत आहेत. परंतु आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक संघ केवळ १२ धावांवर ऑलआऊट झाला आहे.
नुकत्याच झालेल्या जपान विरुद्ध मंगोलिया सामन्यातील ही घटना आहे. मंगोलियन क्रिकेट संघाने केवळ ७ महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला आहे. मंगोलियन संघाने एशियन गेम्समधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एन्ट्री केली होती.
जपानविरुद्धच्या सामन्यात मंगोलिया अवघ्या १२ धावांवर गारद झाला. टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. यासह जपानने हा सामना २०५ धावांच्या फरकाने जिंकला. याआधी एक संघ केवळ १० धावांवर ऑलआऊट झाला होता.
मंगोलियन संघ सध्या जपानच्या दौऱ्यावर आहे. त्यांच्यामध्ये ७ टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात प्रथम खेळताना जपानने २० षटकात ७ गडी गमावून २१७ धावा केल्या होत्या. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मंगोलियन संघाने डावाच्या पहिल्याच चेंडूवर आपली विकेट गमावली.
एक एक करून सर्व खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले आणि ११ खेळाडूंपैकी ७ खेळाडू शुन्यावर बाद झाले. जपानसाठी डावखुरा वेगवान गोलंदाज काझुमा काटो-स्टाफोर्डने ३.२ षटकात केवळ ७ धावा देत ५ बळी घेतले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा प्रवास मंगोलियन संघासाठी चांगला राहिलेला नाही. मंगोलियाने त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना २७ सप्टेंबर २०२३ रोजी खेळला. त्या सामन्यात प्रथम खेळणाऱ्या नेपाळने २० षटकात ३१४ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मंगोलियाचे खेळाडू अवघ्या ४१ धावांवर सर्वबाद झाले. त्यांच्या दुसऱ्या सामन्यातही त्यांना मालदीवकडून ९ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.