मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पंतप्रधान मोदींनी संसदेवर बहिष्कार टाकलाय का? ते संसदेत येऊन निवेदन का देत नाहीत? काँग्रेस नेत्याचा सवाल

पंतप्रधान मोदींनी संसदेवर बहिष्कार टाकलाय का? ते संसदेत येऊन निवेदन का देत नाहीत? काँग्रेस नेत्याचा सवाल

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Dec 20, 2023 05:05 PM IST

Mallikarjun Kharge slams Modi : संसदेतील घुसखोरीसारख्या गंभीर बाबीवर जर पंतप्रधान बोलणार नसतील तर कोणत्या विषयावर बोलतील? पंतप्रधान मोदींनी संसदेवर बहिष्कार तर टाकलेलं नाही ना, असा सवाल कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे.

Congress President Mallikarjun Kharge
Congress President Mallikarjun Kharge (Mohd Zakir)

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे इथेच, दिल्लीत आहेत. ते संसदेत झालेल्या घुसखोरीविषयी सभागृहामध्ये येऊन झालेल्या घटनेबद्दल निवेदन का करत नाही? संसदेतील घुसखोरीसारख्या गंभीर बाबीवर जर पंतप्रधान बोलणार नसतील तर कोणत्या विषयावर बोलतील? पंतप्रधान मोदींनी संसदेवर बहिष्कार तर टाकलेलं नाही ना, असा संतप्त सवाल कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. बुधवारी संसद परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते.

ट्रेंडिंग न्यूज

गेल्या आठवडा भराच्या काळात संसदेच्या दोन्ही सभागृहातून विरोधी पक्षाच्या १४३ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. १३ डिसेंबर २०२३ रोजी संसदेत झालेल्या घुसखोरीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन करावं, अशी मागणी हे सर्व खासदार करत होते.

वाराणसी, अहमदाबादेत बोलता मग संसदेत का नाही?

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह हे वाराणसी, अहमदाबाद येथे जाऊन बोलत आहेत. शिवाय टीव्ही माध्यमाशी बोलत आहेत. खरं तर संसदेचं अधिवेशन सुरू असताना महत्वाच्या धोरणांची निगडीत विषय संसदेतच बोलणे अपेक्षित असते. परंतु नियमांची पायमल्ली करून तुम्ही बाहेर बोलत आहात. संसदेत येऊन का बोलत नाही, असा सवाल खर्गे यांनी यावेळी केला.

आज दोन खासदारांचं निलंबन; एकूण संख्या १४३

दरम्यान, आज बुधवारी आणखी दोन खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. आज निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे खासदार अलप्पुझा (केरळ) मतदारसंघाचे लोकसभा सदस्य ए एम आरिफ व केरळ कॉंग्रेस (एम) पक्षाचे कोट्ययम मतदारसंघाचे लोकसभा सदस्य थॉमस छाजिकदन यांचा समावेश आहे.

‘लोकसभेतून काल ज्या खासदारांना निलंबित करण्यात आलं त्यांच्यासोबत सभागृहाच्या आत मी सुद्धा आंदोलनात सहभागी झालो होतो. परंतु त्यांनी मला काल निलंबित केलं नाही. परंतु आज निलंबित केलं. आरिफ हे काल लोकसभेत नव्हते. आज ते आले. आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी निवेदन करावं, अशी मागणी केली. त्यामुळं आमच्या दोघांचं निलंबन झालं’ अशी प्रतिक्रिया थॉमस यांनी दिली.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या