Tamil Nadu Road Accident : तामिळानाडू राज्यातील तिरुमंगलम येथे भीषण अपघात झाला आहे. शिवराकोट्टई येथे विरुधुनगर आणि मदुराई महामार्गावर बुधवारी (१० एप्रिल) सकाळी साडे सहा वाजता झालेल्या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव कारने बाइकला धडक दिली. धडक दिल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव कार हवेत उडून दुसऱ्या लेनमध्ये जाऊन आदळली. या अपघातात ५ लोकांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या अपघाताचा अंगावार काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, भरधाव वेगाने येणारी कार पुढे चाललेल्या दुचाकीला जोराची धडक देते. या धडकेनंतर अतिवेगामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटते व अनियंत्रित कार हवेत उडून तिसऱ्या लेनमध्ये आदळते. कार बाईकला धडकून इतर काही गाड्यांवरही आदळले. काही सेकंदात ही भीषण दुर्घटना घडल्याचे दिसते.
मंदिरातून परतत होते कुटूंब -
विलापुरम येथे राहणारे कनागावेल आपल्या कुटूंबासह थलवाईपुरममध्ये एका मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. तेथून परतत असताना मणिकंदम फोर-वे लेन वर कनागावेल यांचे कारवरील नियंत्रण सुटले व कारने मोटारसायकलस्वाराला उडवले. त्यावेळी कारचा वेग खूपच अधिक होता.
बाइकला धडक दिल्यानंतर कार अनियंत्रित होऊन हवेत पलटी खात विरुद्ध दिशेला दुसऱ्या लेनमध्ये कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. दरम्यान कारमध्ये काही लोक सुखरुप वाचले आहेत.
अपघातग्रस्त कारच्या पुढील भागाचा चुराडा झाला असून कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, शिवराकोट्टई येथे चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने कार महामार्गावरून घसरली व आधी दुभाजकावर आदळून नंतर दुचाकीला ध़डकली.
या अपघातात चालक आर कनागावेल (६२),त्यांची पत्नी कृष्णाकुमारी (५१), त्यांची सून नागज्योती (२८) आणि तिची मुलगी शिवा अथमिका (८) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात मोटारसायकलस्वार जी. पांडी (५२) यांचाही मृत्यू झाले. ते निलायुर येथील फळविक्रीचा व्यवसाय करत होते. कल्लाकुरिची पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे.
संबंधित बातम्या