chhattisgarh Durg district accident : छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात मंगळवारी रात्री कर्मचाऱ्यांनी भरलेली बस सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात १५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले. त्यापैकी ७ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच कुम्हारी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले व बचावकार्य सुरू केले. जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. प्राथमिक उपचारानंतर जखमींना रायपूर एम्समध्ये पाठवण्यात आले आहे. मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी जखमींवर उत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दुर्ग शहर पोलीस अधीक्षक (छावणी क्षेत्र) हरीश पाटील यांनी सांगितले की, कुम्हारी पोलीस स्टेशन हद्दीतील खापरी गावाजवळ मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास हा अपघात झाला. हे कर्मचारी केडिया डिस्टिलरी कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. हे कर्मचारी ड्युटी संपवून घरी परतत होते. केडिया डिस्टिलरीने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. अपघातातील अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी मुरुमच्या खाणी असल्याचे सांगण्यात येत आहे. काही अहवालात असा दावाही करण्यात आला आहे की, बसमध्ये लाइट नव्हते. यामुळे चालकाला याचा अंदाज आला नाही आणि बस खाणीत कोसळली. उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यात कोणाचा निष्काळजीपणा आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री शर्मा यांनी रायपूर एम्समध्ये पोहोचून जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. दुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी या अपघाताच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेशही दिले आहेत.
बसमध्ये ४६ कर्मचारी प्रवास करत होते. हे कर्मचारी काम संपवून घरी जात होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. सर्व जखमींना रायपूर एम्स आणि मेकहारामध्ये आणण्यात आले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये महिलांचाही समावेश आहे. बस रस्त्यावरून घसरली आणि ५० फूट खोल खाणीत पडली.
पीएम मोदींनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. छत्तीसगडमधील दुर्ग येथे झालेला बस अपघात अत्यंत दुःखद असल्याचे पीएम मोदींनी ट्विटरवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत असे मोदी यांनी म्हटले आहे. जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यात गुंतले आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी X वरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे- दुर्गच्या कुम्हारीजवळ एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी भरलेल्या बसला अपघात झाल्याची दुःखद माहिती मिळाली. दिवंगत आत्म्यांना शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. शोकाकुल कुटुंबीयांना ईश्वर शक्ती देवो. या अपघातात जखमी झालेल्यांवर उत्तम उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे.
माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोशल मीडियावर लिहिले: 'कर्मचाऱ्यांनी भरलेली बस कुम्हारी येथे खाणीत पडली. बसमध्ये ४६ जण होते असे सांगण्यात येत आहे. या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. जखमींवर योग्य उपचार करण्याची मी जिल्हा प्रशासनाला विनंती केली आहे.