Raj Thackeray Speech : मनसेचा गुढीपाडवा आज शिवतीर्थावर पार पडला. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी अनेक खुलासे केले. राज ठाकरेंनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या भेटीतील चर्चेबाबत देखील खुलासा केला. राज ठाकरे म्हणाले की, जागा वाटपाची चर्चा झाली. मी शेवटच्या जागा वाटपाच्या चर्चेला १९९५ ला बसलो. त्यानंतर मी कधी चर्चेला बसलो नाही.
मला कमळ चिन्हावर लढण्यास सांगितलं मात्र हे रेल्वे इंजिन आहे ना हे तुमच्या कष्टाने कमावलेलं चिन्ह आहे. माझ्याकडे आयतं आलेलं नाही. सहज आलंय म्हणून लढवायचं अजिबात नाही.
शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रमुखपद राज ठाकरे स्वीकार असल्याच्या चर्चेवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा माझ्या घरी ३२ आमदार आणि ६ ते ७ खासदार जमले होते. आपण एकत्र बाहेर पडू, असे ते म्हणत होते. मात्र, त्यानंतर मी महाराष्ट्र दौरा सुरु केला. अनेकांना वाटलं मी काँग्रेसमध्ये जाईन. पण मी तेव्हाच स्पष्ट केलं होतं की, मला पक्ष फोडून कुठली गोष्ट करायची नाही. माझ्या मनात असा कोणताही विचार नाही. पण जर मी पक्षातून बाहेर पडलो तरी मी स्वत:चा पक्ष काढेन. पण मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही, हे मी तेव्हाच ठरवले होते. तरीही मी त्यावेळी एकाला संधी दिली होती. पण त्याला समजलंच नाही, असा टोलाही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. तसेच आता कोणत्याही पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, उत्तम संघटना बांधणी करा, मतदारसंघ बांधा. मागे-पुढे पाहू नका आणि तुम्ही विधानसभेच्या जोरदार तयारीला लागा.