मनसेच्या शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर विरोधकांवरून कडवी टीका केली जात आहे. राज ठाकरे (raj Thackeray) दिल्ली दरबारी गेले त्यावेळीच ते भाजपसोबत जाणार हे मराठी जनतेला समजले होते. मात्र वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल, असे वाटले नव्हते', असा टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar criticized raj Thackeray) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लगावला आहे.
विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) म्हणाले, राज ठाकरे भाजपसोबत गेल्याने त्यांची वाघाची शेळी झाली आहे. वाघ इतक्य लवकर गवत खाईल असे वाटले नव्हते.. राज ठाकरे या लढवय्या नेत्याने गुलामगिरीचे जोखड गळ्यात का घातले? समजत नाही. मात्र राज ठाकरे महायुतीत गेल्याने महाविकास आघाडीच्या मतांवर काहीही परिणाम होणार नाही. २०१९ च्या निवडणुकीत राज ठाकरेंनी मोदींच्या विरोधात भूमिका घेतली होता, आता त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यांची कोणतीही भूमिका ठाम नाही.
दरम्यान राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. त्यांनी ट्विट केले आहे की,
"सस्नेह स्वागत !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख श्री राज ठाकरे जी यांचा अत्यंत आभारी आहे, आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशाआकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या!, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली आहे, मुख्यमंत्री म्हणाले मी राज ठाकरे यांच्या निर्णयाचं स्वागत करतो. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आपला देश वेगाने प्रगती करत आहे. देशाचा विकास झाला आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे.
तसेच राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशही दिले आहेत. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांचं बरोबर आहे. त्यांचा एक पक्ष आहे आणि प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. आता लोकसभा निवडणूक होऊ द्या. लोकसभा निवडणूक झाल्यावर विधानसभेचं पाहण्यात येईल.
संबंधित बातम्या