Maharashtra Weather Update : राज्यात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात हा पाऊस होणार आहे. वादळीवाऱ्यासह वीजांचा गडगडाट आणि गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना यलो अलर्ट तर अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडतांना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार हवेची चक्रीय स्थिती म्हणजे सायक्लॉनिक सर्कुलेशन सध्या महाराष्ट्राच्या मध्यभागावर आहे. कोकण गोव्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार आहे. तर मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, सांगली व सोलापूर येथे ११ व १२ तारखेला व मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पुढील ४ ते ५ दिवस मेघ गर्जनेसह वीजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस व गारा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्याच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवस काही बदल होणार नाही. त्यानंतर पुढील तीन दिवस तापमानात हळूहळू घट होईल. यामुळे उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
पुणे व परिसरात १३ एप्रिल पर्यंत आकाश मुख्यत: निरभ्र राहणार आहे. तर दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
मध्य मध्य महाराष्ट्रावर वरचे हवेचे चक्रीवादळ आणि उत्तर-गुजरात ते दक्षिण तामिळनाडू पर्यंत वाऱ्याच्या विस्कळीत होण्याच्या परिणाम होणार असून यामुळे मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसमध्ये मेघगर्जना, विजा, गारा, पाऊस पडणार असल्याने या प्रदेशात बहुतांश जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. परंतु उच्च तापमान आर्द्रतेच्या उपस्थितीमुळे वास्तविक तापमानापेक्षा जास्त जाणवणार आहे. जर अत्यावश्यक काम नसल्यास, सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत बाहेर पडणे टाळा, असे आवाहन देखील हवामान विभागाने केले आहे.
संबंधित बातम्या