MP Ganeshamoorthy dies by suicide over denial of party ticket : देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पक्षातर्फे उमेदवारी देत असतांना उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुक नाराज होत आहेत. दरम्यान, तामीळनाडू येथील एमडीएमकेच्या खासदार खासदार ए गणेश मूर्ती यांनी तिकीट न मिळाल्याने टोकाचे पाऊल उचलत रविवारी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू असतांना आज गुरुवारी चार दिवसांनंतर त्यांची प्राणज्योत मालवली.
गणेशमूर्ती हे एमडीएमकेचे (वायको पक्ष) इरोडचे खासदार होते. पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने ते नाराज होते. यामुळे नैराश्यात गेल्याने ७४ वर्षीय गणेशमूर्ती यांनी रविवारी किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही घटना लक्षात येताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने दवाखाण्यात भरती केले होते. गणेशमूर्ती यांनी सल्फास हे किटकनाशक त्यांनी प्राशन केल्याने त्यांची प्रकृती ही गंभीर होती.त्यांना अत्यवस्थ अवस्थेत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांचावर उपचार सुरू होते. मात्र, आज गुरुवारी पहाटे ५:०५ वाजता त्यांचे निधन झाले.
मारुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (MDMK) च्या विद्यमान खासदाराच्या आशा मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी त्यांना उलट्या होत असल्याने बेशुद्ध झालेले खासदार ए. गणेशमूर्ती यांना आधी इरोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर त्यांना कोईम्बतूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
तिकीट न मिळाल्याने गणेशमूर्ती नाराज होते. त्यांचा पक्ष MDMK तमिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुनेत्र कळघम (DMK) सोबत युती करत आहे. दोन्ही पक्षांनी अलीकडेच एमडीएमकेचे सरचिटणीस दुराई वायको यांचा मुलगा दुराई वायको यांना इरोडमधून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या कोअर टीमने बराच विचारविनिमय केल्यानंतर दुराई यांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतल्याचे वायको यांनी रविवारी सांगितले होते. यामुळे गणेशमूर्ती हे नाराज होते. त्यांनी रविवारी विष प्राशन केले. या प्रकरणी इरोड पोलिसांनी यापूर्वीच आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. रुग्णालय प्रशासनाने मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. पोलिसांनी मृतदेह तपासणीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (आयआरटी) मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेला.
पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, शवविच्छेदनानंतर मृतदेह येथून १५ किमी अंतरावर असलेल्या कुमारवलसू गावात नेण्यात येणार असून या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. गणेशमूर्ती २०१९ मध्ये डीएमकेच्या उगवत्या सूर्य निवडणूक चिन्हावर खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी यापूर्वी १९९८ मध्ये पलानी आणि २००९ मध्ये इरोडमधून लोकसभा निवडणूक जिंकली होती. गणेशमूर्ती यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.