मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB Vs DC : आरसीबीचा मोठा धमाका, दिल्लीचा धुव्वा उडवत टॉप ५ मध्ये एन्ट्री, प्लेऑफच्या आशा कायम

RCB Vs DC : आरसीबीचा मोठा धमाका, दिल्लीचा धुव्वा उडवत टॉप ५ मध्ये एन्ट्री, प्लेऑफच्या आशा कायम

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 12, 2024 11:11 PM IST

RCB Vs DC IPL Highlights : आयपीएल २०२४ मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने होते. या सामन्यात आरसीबीने दिल्लीचा धुव्वा उडवला.

Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals Highlights
Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals Highlights (PTI)

आयपीएल २०२४ चा ६२ वा सामना आज (१२ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने दिल्लीचा ४७ धावांनी पराभव केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

यासह आरसीबीनेगुणतालिकेतही मोठी झेप घेतली. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना RCB संघाने १८८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सला १९.१ षटकात केवळ १४० धावाच करता आल्या आणि सामना गमावला.

एका सामन्याच्या बंदीमुळे ऋषभ पंत या सामन्यात खेळला नाही. अशा परिस्थितीत संघ संघर्ष करताना दिसला. पंतच्या जागी अक्षर पटेलने कर्णधारपदाची धुरा सांभाळली आणि संघासाठी ३९ चेंडूत सर्वाधिक ५७ धावांची खेळीही खेळली. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

त्याच्याशिवाय शाई होपने २९ आणि जेक फ्रेझर-मॅकगर्कने २१ धावा केल्या. दुसरीकडे, आरसीबीच्या गोलंदाजांनी मिळून दमदार खेळ दाखवला. यश दयालने ३ तर लोकी फर्ग्युसनने २ बळी घेतले. तर स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज आणि कॅमेरून ग्रीन यांनी १-१ विकेट घेतली.

आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीत कायम

आरसीबीचा हा सलग पाचवा विजय आहे. हा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. १३ सामन्यांत ६ विजय आणि ७ पराभवांसह त्यांचे १२ गुण आहेत. दिल्लीवरील विजयासह संघ पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. बेंगळुरूला शेवटचा सामना १८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध चिन्नास्वामी येथे खेळायचा आहे. या सामन्यावर दोन्ही संघांचे भवितव्य अवलंबून असेल. चेन्नई जिंकल्यास आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.

त्याचवेळी, बेंगळुरूने जिंकल्यास त्यांना चांगल्या फरकाने जिंकावे लागेल जेणेकरून नेट रन रेट चेन्नईपेक्षा चांगला होऊ शकेल. यानंतरही बंगळुरूला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. 

बेंगळुरू-दिल्ली आणि लखनौ या तिघांचेही १२-१२ गुण आहेत. लखनौने आतापर्यंत केवळ ११ सामने खेळले असून हा संघ १६ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. त्याच वेळी, दिल्ली आणि बेंगळुरू यांनी १३-१३ सामने खेळले आहेत. या पराभवामुळे दिल्लीला आता केवळ १४ गुणांचीच मजल मारता येणार आहे. मात्र, यासाठी त्यांना १४ मे रोजी त्यांच्या घरच्या मैदानावर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध विजय मिळवावा लागेल.

कोलकाता संघ आधीच १८ गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. त्याचवेळी राजस्थान १२ सामन्यांत १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईचे १३ सामन्यांनंतर १४ गुण आहेत, तर सनरायझर्स १२ सामन्यांत १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

बंगळुरूचा डाव

बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून १८७ धावा केल्या होत्या. रजत पाटीदारने ३२ चेंडूत ५२ तर विल जॅकने २९ चेंडूत ४१ धावा केल्या. विराट कोहलीने २७ धावा केल्या होत्या.

IPL_Entry_Point