Congress bharat jodo nyaya yatra : काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रेला सुरवात होण्याआधीच अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागण्याची चिन्ह आहे. मणिपूर सरकारने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. पूर्व इंफाळ जिल्ह्यातील हाफ्ता कांगजेबुंग या मैदानापासून १४ जानेवारीला सुरू होणार्या राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ला राज्याच्या एन बिरेन सिंग सरकारने परवानगी नाकारली आहे. यानंतर मणिपूर प्रदेश काँग्रेस कमिटीला यात्रा सुरू करण्यासाठी आता पर्यायी जागेची व्यवस्था करावी लागणार आहे.
काँग्रेस १४ जानेवारी ते २२ मार्च दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रा काढली जाणार आहे. या यात्रेला मणीपुर पासून सुरुवात केली जाणार आहे. मात्र या यात्रेला मणीपुर सरकारने परवानगी नाकारली आहे. या बाबत मणिपूर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष के. मेघचंद्र यांनी बुधवारी सांगितले की, "भारत जोडो न्याय यात्रेच्या स्थळाच्या परवानगीबाबत आम्ही आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हाफ्ता कांगजीबुंग, पॅलेस मैदानापासून ही यात्रा सुरू करण्यास परवानगी नाकारली आहे.
मेघचंद्र म्हणाले, "परवानगी नकारने हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. या सोबतच मणिपूरच्या लोकांच्या राजकीय अधिकारांचेही उल्लंघन देखील आहे. सरकारने सार्वजनिक ठिकाणी यात्रेला परवानगी देण्यास नकार दिला तरी, आम्ही नियोजित कार्यक्रमासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करू. ही यात्रा तरुणांची, महिलांची, शेतकऱ्यांची आणि गरिबांची आहे.
मेघचंद्र यांनी बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांची इंफाळ येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत एमपीसीसीचे उपाध्यक्ष हरेश्वर गोस्वामी, एमपीसीसीचे कार्याध्यक्ष के. देबदत्त आणि एमपीसीसीचे वरिष्ठ प्रवक्ते निंगोम्बम भूपेंदा हे देखील सोबत होते.
भारत जोडो न्याय यात्रा ही मणिपूर ते मुंबई अशी रहाणार आहे. ही यात्रा १४ जानेवारी पासूंन इंफाळ येथून सुरू होणार आहे. याचे नेतृत्व राहुल गांधींसह मणीपुर काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ नेते करणार आहे. ही यात्रा ६६ दिवसांत १५ राज्यांतून तब्बल ६७०० किमी अंतर कापून ही यात्रा २० मार्च रोजी मुंबईत संपेल. या यात्रेत ११० जिल्हे, १०० लोकसभेच्या मतदार संघ आणि ३३७ विधानसभा मतदार संघातून निघणार आहे.
सोमवारी, काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची एक टीम 'भारत जोडो न्याय यात्रे'च्या आधीच्या तयारीच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी इंफाळला पोहोचली होती. यावेळी वेणुगोपाल म्हणाले, "मणिपूरला न्याय हवा आहे, असे आम्हाला वाटल्याने आम्ही येथून ही यात्रा सुरू करत आहोत. मणिपूरवर झालेली जखम भरून निघायला हवी. मणिपूरबद्दल प्रेम आणि आपुलकीचा संदेश द्यायला हवा." दुसरीकडे, एका कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री बिरेन सिंह म्हणाले की, मणिपूरमधील सध्याची कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे ही परवानगी नाकारण्यात आली आहे.