Congress Nyay yatra News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १४ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत जोडो न्याय यात्रेचे ठिकाण काँग्रेसने बदलले आहे. ही यात्रा मणिपूरची राजधानी इंफाळच्या पॅलेस मैदानापासून सुरू होणार होती. मात्र, सरकारने परवानगी नाकारल्याने काँग्रेसने हे पाऊल उचलले आहे. ही यात्रा आता थौबल जिल्ह्यातील खोंगजोम येथून सुरू होणार आहे.
मणिपूर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख के मेघचंद्र यांनी सांगितले की, पक्षाने न्याय यात्रेचे ठिकाण बदलले आहे. ही यात्रा आता इम्फाळ एवजी थौबल जिल्ह्यातील खोंगजोम येथून काढण्यात येणार आहेत. इम्फाळ येथून ही यात्रा सुरू करण्यास मणीपुर च्या एन. बीरेन. सिंग सरकारने परवानगी नाकारली होती. यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसनेत्यांनी या प्रकाराला अत्यंत दुर्दैवी म्हंटले होते. दरम्यान, काँग्रेस आपली भारत जोडो न्याय यात्रा ही मणिपूरमधून सुरू करण्यास वचनबद्ध असून जुने ठिकाण बदलण्यात आले आहे. त्या ऐवजी आता ही यात्रा नव्या ठिकाणाहून सुरू होणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे १४ जानेवारी रोजी भारत जोडो न्याय यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. ही न्याय यात्रा १४ राज्ये आणि ८५ जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे. काँग्रेसने यापूर्वी राज्य सरकारकडे इम्फाळमधील पॅलेस मैदानावरून ही यात्रा सुरू करण्यास परवानगी मागितली होती. मात्र, राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्था आणि राज्यातील परिस्थितीचा हवाला देत येथून ही यात्रा सुरू करण्यास नकार दिला होता.
राज्य सरकारने प्रस्तावित 'भारत जोडो न्याय यात्रा' १४ जानेवारीपासून मर्यादित संख्येने सहभागी होऊन सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, काँग्रेसने ही परवानगी फेटाळली होती. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून, १४ जानेवारीला यात्रेला मर्यादित संख्येने सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे," असे इंफाळ पूर्व जिल्ह्याच्या जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले होते. यात्रेत सहभागी होणाऱ्या व्यक्तींचे नावे, क्रमांक व इतर माहिती ही आधीच पोलिसांना उपलब्ध करून द्यावी जेणेकरून हे कार्यालय सर्व आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करू शकेल, असे काँग्रेसला देण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.