Congress Bharat Jodo Nyay Yatra : देशातील सध्याच्या राजवटीवर तोफा डागत मणिपूर ते मुंबई न्याय यात्रा सुरू करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या यात्रेत पदोपदी अडथळे येत आहेत. बिहार-पश्चिम बंगालच्या सीमेवर राहुल यांच्या कारवर दगडफेक झाल्याचं वृत्त आहे. यात त्यांच्या कारची काच फुटली आहे. काँग्रेसनं या घटनेवर तात्काळ खुलासा केला आहे.
काँग्रेस नेते खासदार अधीररंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) यांनी हा दगडफेकीचा आरोप केला आहे. मणिपूरमधून सुरू झालेली राहुल गांधी यांची यात्रा मंगळवारी पश्चिम बंगालमार्गे बिहारमध्ये आली. बिहारमध्ये त्यांनी एक रोड शो केला. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये परतत असताना मालदा जिल्ह्यातील हरिश्चंद्रपूर भागात त्यांच्या कारवर हल्ला झाला.
'अज्ञात व्यक्तींनी गांधी यांच्या कारवर दगडफेक केली. हा निषेधार्ह प्रकार आहे, असं चौधरी म्हणाले. राहुल गांधी यांनी नियोजित ठिकाणी पोहोचल्यानंतर गाडीतून उतरून नासधूस झालेल्या कारची पाहणी केली.
'कारच्या मागील बाजूच्या गर्दीतून कुणीतरी दगडफेक केली असावी... त्याकडं पोलिसांचं दुर्लक्ष होत आहे. दुर्लक्ष केल्यामुळं बरेच काही घडू शकतं. ही एक छोटीशी घटना आहे, पण काहीतरी घडू शकलं असतं, अशी भीती चौधरी यांनी एएनआयशी बोलताना व्यक्त केली.
विरोधकांच्या इंडिया आघाडीत असलेली काँग्रेस व तृणमूल काँग्रेस यांच्यात पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या जागावाटपावरून कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. या निर्णयासाठी काँग्रेसचे नेते चौधरी जबाबदार असून ते भाजपचे एजंट असल्याचा आरोप तृणमूलनं केला आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांना शांत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. अशातच ही घटना घडल्यामुळं आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
अधीररंजन चौधरी यांनी केलेला दगडफेकीचा दावा खुद्द काँग्रेस पक्षानंच फेटाळला आहे. काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमधील मालदा इथं राहुल गांधींना भेटण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीतील एक महिला राहुल यांना भेटण्यासाठी अचानक त्यांच्या कारसमोर आली, त्यामुळं अचानक ब्रेक लावावा लागला. त्यावेळी सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या दोरीमुळं गाडीची काच फुटली, असं काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे.