Raghuram Rajan : आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन 'मातोश्री'वर; आदित्य ठाकरे काय म्हणाले पाहाच!-former rbi governor raghuram rajan meets uddhav thackeray in mumbai ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raghuram Rajan : आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन 'मातोश्री'वर; आदित्य ठाकरे काय म्हणाले पाहाच!

Raghuram Rajan : आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन 'मातोश्री'वर; आदित्य ठाकरे काय म्हणाले पाहाच!

Jan 31, 2024 02:50 PM IST

Raghuram Rajan Meets Uddhav Thackeray : आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नुकतीच मातोश्री निवास्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळं चर्चेला उधाण आलं आहे.

Raghuram Rajan meets Uddhav Thackeray at Matoshree
Raghuram Rajan meets Uddhav Thackeray at Matoshree

Raghuram Rajan at Matoshree : जागतिक ख्यातीचे अर्थतज्ज्ञ व रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी मातोश्री निवासस्थानी जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. आदित्य ठाकरे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या भेटीचा फोटो शेअर केला असून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राजन यांची ही सदिच्छा भेट होती असं बोललं जात आहे. ठाकरे कुटुंबीयांनी राजन यांचं स्वागत केलं. रश्मी ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे हेही यावेळी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांनी राजन यांच्या भेटीबद्दल इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. 'रघुराम राजन यांचं मातोश्री निवासस्थानी आदरातिथ्य करता आलं याचा मनापासून आनंद झाला, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

धक्कादायक! देशातील ७५ कोटी टेलिकॉम ग्राहकांचा डेटा धोक्यात, आधारपासून फोन नंबरपर्यंत सर्व काही लीक

'आरबीआयचे गव्हर्नर म्हणून आणि इतर वेगवेगळ्या पदावरून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत दिलेलं मोठे योगदान मोठं आहे. भविष्यवेधी दृष्टी असलेल्या अशा तज्ज्ञांनी भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा दिली पाहिजे, असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

नरेंद्र मोदी यांचे टीकाकार

रघुराम राजन हे मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी होते. स्वत: अर्थतज्ज्ञ असलेल्या मनमोहन सिंग यांच्या सोबत त्यांचे उत्तम सूर जुळले होते. त्या काळात त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीनं अनेक कठोर निर्णय घेतले.

देशात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतरही अल्पकाळ ते या पदावर होते. मात्र, अनेक बाबतीत त्यांचं मोदी सरकारशी जमलं नाही. केंद्राच्या नोटबंदीच्या निर्णयाला त्यांचा विरोध होता. केंद्र सरकारला जे काही साध्य करायचं आहे, तो नोटबंदीसारखा निर्णय न घेताही साध्य करता येईल, असं राजन यांचं मत होतं. मात्र, केंद्र सरकारनं त्यांच्या मताला फारसं महत्त्व दिलं नाही. कालांतरानं ते या पदावरून दूर झाले. मात्र, भारतीय अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीवर ते अधूनमधून मत मांडत असतात.

IFCI Share Price : शेअर असावा तर असा! अवघ्या दहा महिन्यात पैसे झाले सातपट

वर्षभरापूर्वी लल्लन टॉप या न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारतातील सध्याच्या अर्थव्यवस्थेवर परखड मतं मांडली होती. मोदी सरकारची 'मेक इन इंडिया' ही योजना कशी फसवी आहे हेही त्यांनी त्या मुलाखतीत सांगितलं होतं.

राजन-ठाकरे भेट चर्चेचा विषय का?

रघुराम राजन हे राजकारणापासून दूर राहतात. आर्थिक विषयाव्यतिरिक्त एखाद्या विषयावर भाष्य करणं ते टाळतात. त्यामुळंच मातोश्री निवासस्थानी जाऊन त्यांनी घेतलेली उद्धव ठाकरे यांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे.

Whats_app_banner