मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  anna hazare news : केजरीवालांना अटक होताच अण्णा हजारे यांनी मौन सोडले! काय म्हणाले पाहा!

anna hazare news : केजरीवालांना अटक होताच अण्णा हजारे यांनी मौन सोडले! काय म्हणाले पाहा!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 22, 2024 05:08 PM IST

Anna Hazare on Arvind Kejriwal : बऱ्याच दिवसांनंतर अण्णा हजारे यांनी देशातील एखाद्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर ते बोलले आहेत.

केजरीवालांना अटक होताच अण्णा हजारे यांनी मौन सोडले! काय म्हणाले पाहा!
केजरीवालांना अटक होताच अण्णा हजारे यांनी मौन सोडले! काय म्हणाले पाहा!

Anna Hazare on Arvind Kejriwal arrest : दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयानं (ED) अटक केल्यानंतर राजकीय व सामाजिक वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. गेल्या काही काळापासून विविध आंदोलनापासून दूर असलेले व कोणत्याही घडामोडींवर प्रतिक्रिया न देणारे समाजसेवक अण्णा हजारे यांनीही तातडीनं प्रतिक्रिया दिली आहे.

अण्णा हजारे हे एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलले आहेत. ‘केजरीवाल हे काही वर्षांपूर्वी माझ्यासोबत काम करत होते. दारूच्या विरोधात आम्ही मिळून आवाज उठवला होता. आज तोच माणूस दारूची धोरणं बनवतोय. याच मला दु:ख झालं. पण काय करणार? सत्तेपुढं काही चालत नाही,’ असं अण्णा हजारे म्हणाले.

‘केजरीवालांना जी अटक झालीय, ती त्यांच्या कृतीमुळंच झाली आहे. हे काम त्यांनी केलं नसतं, तर अटक व्हायची वेळच आली नसती. आता जे झालंय ते झालंय. कायदा पुढचं काम करेल. सरकार बघेल. त्यावर विचार करेल,’ असं हजारे यांनी म्हटलं आहे.

अण्णांच्या आंदोलनातूनच पुढं आले होते केजरीवाल

काँग्रेसच्या काळात अण्णा हजारे यांनी दिल्लीच्या जंतरमंतरवर भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन केलं होतं. अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक तरुण त्यावेळी या आंदोलनात होते. देशातील काँग्रेसचं सरकार घालवण्यात या आंदोलनाचा मोठा वाटा होता. कालांतरानं याच आंदोलनातून पुढं आलेल्या केजरीवाल यांनी राजकीय पक्ष काढला. केजरीवालांच्या राजकीय पक्षानं राजधानी दिल्लीत मोठं यश मिळवलं. त्यानंतर अलीकडंच पंजाबमध्येही सत्ता मिळवली. तसंच, देशातील अनेक राज्यांत दखलपात्र शिरकाव केला. सुरुवीताला केजरीवाल यांना आशीर्वाद देणारे अण्णा हजारे नंतर त्यांच्यापासून लांब गेले होते.

अण्णा हजारे विरोधकांच्या रडारवर

देशात सत्ताबद्दल झाल्यापासून अण्णा हजारे यांची आंदोलनं पूर्ण थांबली आहेत. शेतकऱ्यांच्या वा इतर कुठल्याही मुद्द्यावर कोणतंही मोठं आंदोलन करताना हजारे दिसले नाहीत. त्यावरून विरोधक हजारेंवर अधूनमधून टीका करत असतात. देशात काहीही घडलं की कुठं गेले अण्णा हजारे? असा प्रश्नही उपस्थित करतात. आताही खासदार संजय राऊत यांनी हजारे यांना लक्ष्य केलं आहे. देशात सुरू असलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या अटकसत्रावर अण्णा हजारे का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी केला आहे.

WhatsApp channel