Delhi CM Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. दिल्लीत एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेली काँग्रेस या संकटात केजरीवालांच्या मागे उभी राहिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे केजरीवाल कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. ईडी विरुद्धच्या न्यायालयीन लढाईत केजरीवालांची मदत करणार असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे.
कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं (ED) काल केजरीवाल यांना अटक केली. ही अटक म्हणजे विरोधकांच्या राजकीय छळाचा भाग आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना पूर्ण पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी लवकरच केजरीवाल किंवा त्यांच्या कुटुंबीयांना भेटून पुढील कायदेशीर बाबींवर चर्चा करणार आहेत. केजरीवाल यांच्या अटकेनंतर काँग्रेसनं केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. भेकड हुकूमशहा मृत लोकशाही जन्माला घालण्याचा प्रयत्न करत आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे.
‘घाबरलेला हुकूमशहा मृत लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मीडियासह सर्व संस्था ताब्यात घेणं, पक्ष फोडणं, कंपन्यांकडून पैसे उकळणं, प्रमुख विरोधी पक्षाची खाती 'गोठवणं' हे सगळं करूनही या असुरी शक्तीची भूक भागलेली नाही. त्यामुळं आता निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक केली जात आहे. त्यांच्यासाठी हा सगळा खेळ झाला आहे. 'इंडिया' आघाडी याला चोख प्रत्युत्तर देईल,' असं राहुल यांनी आपल्या 'एक्स' पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण गैरव्यवहाराप्रकरणी ईडीकडून गेल्या वर्षभरापासून चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात माजी मंत्री मनीष सिसोदिया, आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह, सत्येंद्र जैन हे तुरुंगात आहेत. ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात केजरीवाल यांचंही नाव होतं. केजरीवाल यांना घोटाळ्यातील आरोपींकडून आर्थिक लाभ झाल्याचा ईडीचा आरोप आहे. याच प्रकरणात ईडीनं काल त्यांना अटक केली. पदावर असताना एखाद्या मुख्यमंत्र्याला अटक होण्याची ही पहिलीच घटना आहे.