मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘राऊत मातोश्रीचे तर वडेट्टीवार सोनिया गांधींकडे घरगडी’, भाजप आमदाराची जहरी टीका

‘राऊत मातोश्रीचे तर वडेट्टीवार सोनिया गांधींकडे घरगडी’, भाजप आमदाराची जहरी टीका

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 12, 2022 05:26 PM IST

गेल्या अडीच वर्षापासून महाराष्ट्रात ज्याप्रमाणे सरकार चालवलं जात आहे, ते पाहता केवळ अपक्ष आमदारच नव्हे,तर सत्तेतील आमदार देखील नाराज आहेत. असे भाजप आमदाराने म्हटले आहे.

भाजप आमदाराची जहरी टीका
भाजप आमदाराची जहरी टीका

मुंबई – राज्यसभा निवडणुकीत भाजपने शिवसेना उमेदवाराचा पराभव केल्यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवली जात आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेच्या पराभवासाठी अपक्षांना दोष देत दगा दिलेल्या आमदारांची यादीच पत्रकारांसमोर वाचून दाखवली तर विजय वडेट्टीवार यांनी अपक्ष आमदारांचा निधी रोखण्याचा इशारा दिला.

ट्रेंडिंग न्यूज

त्याचबरोबर राज्यसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने अपक्ष आमदारांना बोलावून निधी देण्यावरून धमक्या दिल्याचा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केला होता. याच मुद्द्यावरून जळगाव मतदार संघाचे भाजपा आमदार संजय कुटे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर बोचरी जहरी केली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय कुटे म्हणाले की, “गेल्या अडीच वर्षापासून महाराष्ट्रात ज्याप्रमाणे सरकार चालवलं जात आहे, ते पाहता केवळ अपक्ष आमदारच नव्हे,तर सत्तेतील आमदार देखील नाराज आहेत. प्रत्येकाला आपल्या मतदार संघासाठी काम करायचं असतं. मतदार संघांतील साडेतीन लाख मतदारांची आमदाराकडून अपेक्षा असते. त्यामुळे निधी न देण्याच्या धमकीला अपक्ष आमदार घाबरणारे नाहीत. अपक्ष असो किंवा भाजपाचे आमदारही अशा धमकीला घाबरणार नाहीत.”

कारण आमदार हे काही कुणाच्या घरचे गडी नाहीत. जसे संजय राऊत मातोश्रीचे घरगडी असतील किंवा विजय वडेट्टीवार हे सोनिया गांधींकडे घरगडी असतील. त्याप्रमाणे अपक्ष आमदार हे काही कुणाकडे घरगडी म्हणून काम करत नाहीत. त्यांचा स्वत:चा स्वाभिमान आहे,” अशा शब्दांत संजय कुटे यांनी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

त्यांनी पुढे बोलताना म्हटलं की, “महाराष्ट्रात कुणाचीही ताकद नाही,की ते निधी थांबवतील किंवा देणार नाहीत. आम्ही महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेचं प्रतिनिधीत्व करतो,ही जनता पाकिस्तानातून आलेली नाही. ही राजेशाही थोडीच आहे. लोकशाहीत निधी मिळवणं हा आमचा हक्क आहे आणि हा निधी कसा मिळवायचा हे अपक्ष आमदारांना आणि आम्हाला माहीत आहे,”असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या