मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे पुन्हा सक्रिय! उद्या मराठवाडा दौऱ्यावर, शेतकऱ्यांशी संवाद साधणार

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे पुन्हा सक्रिय! उद्या मराठवाडा दौऱ्यावर, शेतकऱ्यांशी संवाद साधणार

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Oct 22, 2022 05:50 PM IST

Uddhav Thackeray Marathwada tour: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या, २३ ऑक्टोबर रोजी मराठवाडा दौऱ्यावर जात असून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray on Marathwada tour from Tomorrow: शिवसेनेत झालेली बंडाळी, पक्षात पडलेली फूट, राज्यात झालेलं सत्तांतर आणि त्यानंतर सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्या व आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा खाली बसल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा सक्रिय होत आहेत. उद्धव ठाकरे हे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार असून पीक नुकसानीमुळं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळं राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यातून कसाबसा सावरत असलेल्या शेतकऱ्याच्या जिवाला लांबलेल्या पावसानं घोर लावला. हे कमी म्हणून की काय, परतीच्या पावसानं धुमशान घातलं. त्यामुळं विदर्भ, मराठवाड्यात उभं पीक आडवं झालं आहे. मागच्या १५ दिवसांत मराठवाड्यात पावसानं धुमाकूळ घातल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाहून गेलं आहे. अनेकांची शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर संकट ओढवलं आहे. 

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. मात्र, ही मागणी पूर्ण होताना दिसत नाही. त्यामुळं आता स्वत: उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या बाजूनं मैदानात उतरणार आहेत. 

शिवसेनेनं प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना तातडीनं मदत कशी करता येईल याची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे उद्या, २३ ऑक्टोबर रोजी संभाजीनगरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना शासकीय मदत लगेच कशी मिळवून देता येईल यासाठी ते शिवसेनेची यंत्रणा कार्यान्वित करणार आहेत, असं पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. त्यांच्या या दौऱ्याच्या घोषणेनंतर आता राज्य सरकार नेमक्या काय हालचाली करते आणि शेतकऱ्यांना काय दिलासा देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

IPL_Entry_Point