मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local: शिंदे सरकारचं ‘मिशन मुंबई’ जोरात; गिरगावातील पहिला प्रश्न तात्काळ सोडवला!

Mumbai Local: शिंदे सरकारचं ‘मिशन मुंबई’ जोरात; गिरगावातील पहिला प्रश्न तात्काळ सोडवला!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Oct 22, 2022 03:11 PM IST

Charni Road Railway Station: एकनाथ शिंदे गटानं मुंबईकरांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केलं असून पश्चिम रेल्वेच्या चर्नी रोड स्थानकातील महत्त्वाचा प्रश्न सोडवला आहे.

Deepak Kesarkar
Deepak Kesarkar

New Ticket Window at Charni Road Station: भाजपच्या मदतीनं राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर शिंदे गटानं आता मुंबईवरही लक्ष केंद्रित केलं आहे. सरकारच्या माध्यमातून मुंबईकरांच्या लहानमोठ्या समस्या सोडवण्यावर भर दिला जात आहे. चर्नी रोड स्थानकात मुंबईकर रेल्वे प्रवाशांना भेडसावणारा तिकीट खिडकीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपात नवी तिकीट खिडकी सुरू करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज या तिकीट खिडकीचे उद्घाटन करण्यात आले. पूल बंद असल्यानं गिरगावकडून चर्नी रोड स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना तिकिटासाठी बरीच पायपीट करून उत्तरेकडे असलेल्या तिकीट खिडकीवर जावं लागत होतं. गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. पालकमंत्री केसरकर यांनी मागील आठवड्यात या स्थानकात जाऊन तेथील बंद पुलाची पाहणी केली होती. तसंच, प्रवाशांच्या समस्याही जाणून घेतल्या होत्या. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, रेल्वे, मुंबई महापालिका आदी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीनं कार्यवाही करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आठच दिवसात तिथं तात्पुरत्या तिकीट खिडकीची व्यवस्था होऊन आज ती प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली.

मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना सुविधा निर्माण करून देण्यासाठी राज्य सरकार वेगानं निर्णय घेत आहे. मुंबईतील नागरिकांच्या अडचणी, तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वीच मी शहराच्या विविध भागातील पोलीस ठाणे, वसाहती, मंदिरे, रुग्णालये, कोळीवाडे आदी ठिकाणी भेटी दिल्या आहेत. तेथील समस्या समजावून घेतल्या आहेत. गिरगाव, दादरसारखे भाग मुंबईचं हृदय आहे. त्यामुळंच चर्नी रोड रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूकडील तिकीट खिडकी तात्पुरत्या स्वरुपात पूर्ववत सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करण्यात आली आहे. यापुढील काळातही अशाच मुलभूत आणि सकारात्मक कामांवर आमचा भर असेल, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.

IPL_Entry_Point

विभाग