मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Milind Narvekar: मिलिंद नार्वेकरांच्या मनात काय?; 'या' ट्वीटमुळं पुन्हा संभ्रम

Milind Narvekar: मिलिंद नार्वेकरांच्या मनात काय?; 'या' ट्वीटमुळं पुन्हा संभ्रम

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Oct 22, 2022 01:18 PM IST

Milind Narvekar Tweet: शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आज केलेल्या एका ट्वीटमुळं त्यांच्या नाराजीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

Milind Narvekar - Uddhav Thackeray
Milind Narvekar - Uddhav Thackeray

Milind Narvekar latest Tweet: एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेचे अनेक नेते, आमदार व खासदार भाजप किंवा शिंदे गटाच्या वळचणीला गेले आहेत. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू व पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याही नाराजीची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. नार्वेकर यांनी आज केलेल्या ट्वीटमुळं त्यात भर पडली आहे. नार्वेकरांच्या मनात नेमकं काय आहे अशा प्रश्न शिवसैनिकांमध्ये चर्चिला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ देत शिवसेनेचे बहुसंख्य आमदार, खासदार त्यांच्या सोबत गेले. शिंदे यांनी भाजपसोबत मिळून सत्ता स्थापन केलीच, शिवाय मुख्यमंत्रीपदही पटकावले. त्यामुळं त्यांच्या गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. शिंदे यांच्याशी संबंध नसलेले शिवसेनेचे अनेक नेतेही आता त्यांच्याकडं गेले आहेत. त्यात रामदास कदम, आनंदराव अडसूळ यांचा समावेश आहे. इतर काही नेतेही कुंपणावर असल्याचं बोललं जातं. मात्र, मिलिंद नार्वेकरांच्या नाराजीच्या चर्चेमुळं पक्षात जास्तच अस्वस्थता आहे.

मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जातात. शिवसेनेचे सचिव असतानाच ते उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यकही आहेत. यापूर्वी शिवसेना सोडणाऱ्या अनेक नेत्यांनी नार्वेकर यांच्यावर आरोप केल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी कायम त्यांना पाठीशी घातलं आहे. आता तेही नाराज असल्याचं बोललं जात असून ते शिंदे गटात सहभागी होण्याची चर्चा आहे. नार्वेकर यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत व त्यांचं अभिष्टचिंतन केलं आहे.

शिवसेनेत फूट पाडण्यामागे व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे अमित शहा हेच असल्याची उघड चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे. उद्धव ठाकरे यांनीही हे जाहीर भाषणात बोलून दाखवलं आहे. त्यामुळं शहा यांच्याबद्दल शिवसैनिकांमध्ये संताप आहे. असं असताना नार्वेकर यांनी शुभेच्छांचं ट्वीट केल्यामुळं त्यांच्या नाराजीची नव्यानं चर्चा सुरू झाली आहे.

भाजपकडून संभ्रमाला हवा

नार्वेकर यांच्याबद्दल शिवसैनिकांमध्ये संभ्रम असताना भाजपकडून त्यास हवा दिली जात आहे. 'नार्वेकर यांचे अमित भाईंशी संबंध चांगले आहेत. माझ्या माहितीनुसार नार्वेकर हे शिवसेनेत नाराज आहेत. राजकारणात काहीही शक्य आहे. त्यामुळं शिवसेनेत कोण राहील आणि कोण जाईल हे सांगता येत नाही, असं सूचक वक्तव्य भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलं आहे

IPL_Entry_Point