Salman khan : सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींविरोधात मकोका कायद्यांतर्गत होणार कारवाई
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Salman khan : सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींविरोधात मकोका कायद्यांतर्गत होणार कारवाई

Salman khan : सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींविरोधात मकोका कायद्यांतर्गत होणार कारवाई

Apr 27, 2024 09:06 PM IST

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी बिष्णोई गँगच्या सहा जणांविरोधात मकोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सलमान खान गोळीबार प्रकरणात  आरोपींविरोधात मकोका कायद्यांतर्गत होणार कारवाई
सलमान खान गोळीबार प्रकरणात  आरोपींविरोधात मकोका कायद्यांतर्गत होणार कारवाई

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत (MCOCA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी लॉरेंस विष्णोई गँगचे (Lawrence Bishnoi) दोन शार्प शूटर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केली असून कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल विष्णोई यांना वाँटेड घोषित केलं आहे.  

मुंबई पोलिसांनी एकूण ६ आरोपींना मकोका कायदा लावला आहे. यामध्ये लॉरेन्स बिष्णोई, अनमोल बिष्णोई, विक्की गुप्ता, सागर पाल, सोनू सुभाष चंदर आणि अनुज थापन आदींचा समावेश आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडून गुजरातच्या साबरमती जेलमध्ये बंद असलेल्या लॉरेन्स बिष्णोईला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. पोलिसांनी लॉरेन्सचा छोटा भाऊ अनमोलविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे. अनमोल सध्या अमेरिकेत आहे. तेथून तो गुन्हेगारी कारवाया नियंत्रित करत असल्याची माहिती आहे. सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी त्याने स्वीकारली आहे.

१४ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजून ५२ मिनिटांनी वांद्रेतील सलमानचे निवासस्थान असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर दोन जणांनी गोळीबार केला होता. त्यांनी पाच गोळ्या झाडल्या होत्या. यामधील तीन गोळ्यांचा नेम चुकला होता. पण एक गोळी सलमानच्या घराच्या भिंतीवर लागली होती. एक गोळी सलमानच्या घरातील ड्रॉईंग रुमच्या भिंतीपर्यंत पोहोचली होती. यानंतर आरोपी दुचाकी तेथेच सोडून पळून गेले होते. 

याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणी बिहारचे शूटर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांनी गुजरातमधून अटक केली होती. त्याचबरोबर त्यांना शस्त्र पुरवणाऱ्या सोनू कुमार, सुभाष चंदर बिष्णोई आणि अनुज थापन यांना पंजाबमधून बेड्या ठोकल्या. पोलिसांनी सलमानच्या घरावर गोळ्या झाडण्यासाठी वापरण्यात आलेली बंदूक हस्तगत केली आहे. 

काय आहे मकोका -

महाराष्ट्र सरकारने १९९९ मध्ये मकोका कायदा संमत केला होता. याला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणतात. संघटित आणि अंडरवर्ल्ड गुन्हेगारी नष्ट करणे हा त्याचा उद्देश आहे. हा कायदा महाराष्ट्र आणि दिल्लीत लागू आहे. मकोकाचे कायद्याचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याअंतर्गत तपास पूर्ण होईपर्यंत त्याला जामीन मिळू शकत नाही. 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर