बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात सलमान खान याचा चित्रपट येणार म्हटलं की, प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळतो. त्याचे चित्रपट आणि चित्रपटांचे सिक्वेल नेहमी गाजतात. २०१५ साली आलेल्या सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. त्याचा हा चित्रपट सगळ्यांनाच आवडला होता. या चित्रपटाचा सलमान खानच्या करिअरवरही मोठा प्रभाव पडला आणि तो पुन्हा एकदा सर्वांचा लाडका बनला. या चित्रपटाचा दुसरा भाग येणार, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. अखेर प्रेक्षकांना आणि सलमानच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी मिळाली आहे.
‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सलमान खान त्याचा मेहुणा आयुष शर्माचा आगामी चित्रपट ‘रुसलान’च्या कार्यक्रमात सहभागी होताना दिसला आहे. यावेळी सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’चा सिक्वेल अर्थात ‘बजरंगी भाईजान २’ लवकरच बनणार असल्याची पुष्टी विजयेंद्र प्रसाद यांनी केली आहे. याबद्दल मोठी माहिती शेअर करताना, त्यांनी म्हटले की, चित्रपटाची स्क्रिप्ट तयार आहे आणि वेळ मिळताच सलमान खानला कथा सांगितली जाईल. त्यानंतरच चित्रपटाचे पुढील काम सुरू होईल. याशिवाय तेलुगुच्या ‘राऊडी राठौर २’ वरही काम सुरू झाले आहे, ज्याची देखील कथा तयार आहे.
‘बजरंगी भाईजान’ हे पात्र सलमान खानच्या गाजलेल्या पात्रांपैकी एक आहे. या चित्रपटात करीना कपूर, हर्षली मल्होत्रा, नवाजुद्दीन सिद्दीकी असे स्टार्स दिसले होते. या चित्रपटाने भारतात ३२०.३४ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर, जगभरात या चित्रपटाने ७०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले होते. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती. ‘बजरंगी भाईजान २’ कधी येणार, असे चाहते सतत विचारत होते.
आता ‘बजरंगी भाईजान २’ची घोषणा करण्यात आली असली, तरी हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु, पुढील वर्षी ईदला सलमान नक्कीच त्याचा एक चित्रपट घेऊन येणार आहे. सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे. नुकतीच त्याची घोषणा अभिनेत्याने केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे शूटिंग मे महिन्यापासून सुरू होणार आहे.